Neeraj Chopra - वर्ल्ड चॅम्पियन बनूनही नीरज चोप्राचे ( Neeraj Chopra) पाय जमिनीवरच असल्याचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकल्यानंतर दिसले. प्रतिस्पर्धी अर्शद नदीमला त्याने सेलिब्रेशन करण्यासाठी बोलावून घेतले आणि भारत-पाकिस्तान खेळाडूंना एकत्रित पाहून सारे आनंदीत झाले. ऑलिम्पिक सुवर्ण आणि जागतिक स्पर्धेतील सुवर्ण, जिंकणारा तो नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतरचा दुसरा भारतीय आहे. हा इतिहास घडवूनही नीरज पहिल्यासारखाच सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसला. बुडापेस्ट येथे उपस्थित भारतीयांचे त्याने आभार मानले. पाकिस्तानी मित्र अन् प्रतिस्पर्धी अर्शद नदीमसोबत त्याने फोटोही काढले.
नीरजने काल ८८.१७ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदक निश्चित केलं. पाकिस्तानचा अर्शद नदीमने ८७.८२ मीटर अंतर पार करून रौप्यपदक, तर झेक प्रजासत्ताकच्या याकुब व्हॅडलेच्जने ( ८६.६७ मी.) कांस्यपदक जिंकले. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीचा भारभर जल्लोष झाला. त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया घेण्यासाठी मीडियाचीही झुंबड उडाली होती. याचवेळी मीडियातील एका पत्रकाराने नीरजच्या आईला एक प्रश्न विचारला अन् त्यावर त्यांनी मन जिंकणारे उत्तर दिले. नीरजने पाकिस्तानी खेळाडूला नमवून गोल्ड मेडल जिंकले, कसं वाटतंय? या प्रश्नावर नीरजची आई म्हणाली, हे बघा मॅडम. मैदानावर सर्वच सारखे आहेत. कोणीतरी जिंकत, तर कोणीतर पराभूत होतं. त्यामुळे कोण हरयाणाचा किंवा कोण पाकिस्तानचा हा प्रश्नच उद्भवत नाही. पाकिस्तानी खेळाडूनं पदक जिंकलं, त्याच्या मलाही आनंद आहे.
नीरज म्हणाला होती की, ''सर्वच बोलत होते की हेच एक पदक राहिले आहे आणि आज तेही पूर्ण झाले. ९० मीटरचं टार्गेट आजही पूर्ण करू शकलो नाही, पण सुवर्ण जिंकलो. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता पुढे अजून बऱ्याच स्पर्धा आहेत आणि त्यात ९० मीटर भाला फेकण्याचा प्रयत्न नक्की करीन. त्या स्पर्धांमध्ये आणखी जास्त जोर लावेन.''
''पहिला थ्रो मला चांगला फेकायचा होता, परंतु तांत्रिक फाऊल झाला. त्यानंतर थोडा निराश झालो, परंतु मी स्वतःला अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी पूश केलं. भारतवासीयांना हे सांगू इच्छितो की, हे तुमचं पदक आहे. आज जागे राहून माझी मॅच पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे आभार. मी आता ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन आहे. तुम्हीही जगात देशाचे नाव मोठं करू शकता. त्यासाठी मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा,'' असेही तो म्हणाला.