नवी दिल्ली : क्रीडाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा असलेल्या लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला नामांकन मिळाले आहे. ‘ब्रेक थ्रू’ पुरस्कारासाठी नीरजला मानांकन लाभले आहे. ब्रिटनची टेनिस स्टार एमा राडूकानू आणि अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बिलेस यांच्यासह एकूण सहा खेळाडू या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. एप्रिल महिन्यात एका व्हर्च्युअल सोहळ्याद्वारे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यंदाच्या वर्षी सात गटांमध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा पार पडणार असून यासाठी नामांकने जगातील १३०० हून अधिक क्रीडा पत्रकार आणि प्रसारकांनी निवडली आहेत. ७१ दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या लॉरियस जागतिक क्रीडा अकादमीद्वारे विजेत्या खेळाडूंची निवड होईल. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीराज हा नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतरचा केवळ दुसरा भारतीय आहे. बिंद्राने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेतला होता. गेल्या वर्षी टोकियो येथे ऑलिम्पिक पदार्पणात नीरजने सुवर्णफेक करत इतिहास रचला होता.
तिसरा भारतीय!या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा नीरज केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी मल्ल विनेश फोगाट आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना लॉरियस पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०११ सालचा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी सचिनला खांद्यावर घेत वानखेडे स्टेडियमवर फेरी मारली होती. हा क्रीडाविश्वातील सर्वोत्तम भावनिक क्षण असल्याचे ठरवत आयोजकांनी सचिनला सन्मानित केले होते.
लॉरियस पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याचा आनंद आहे. माझ्यासाठी अत्यंत सन्मानजनक आहे. टोकियोमध्ये माझ्या पदकाला जागतिक ओळख मिळाली. आपल्या देशाचे प्रतिनिधित्त्व करुन पदक जिंकण्याचा आनंद वेगळाच आहे. इतक्या शानदार खेळाडूंसह मलाही नामांकन मिळाले, ही गर्वाची बाब आहे. - नीरज चोप्रा
ब्रिटनची युवा टेनिसपटू एमा राडूकानूलाही ब्रेक थ्रू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. तिने वयाच्या १८ व्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली. दानिल मेदवेदेव (टेनिस), पेड्री (फुटबॉल), यूलिमार रोजास (ॲथलेटिक्स), एरियार्ने टिटमस (जलतरण) यांनाही नामांकन मिळाले.