ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) हा केवळ त्याच्या भविष्याबाबत विचार करत नाही, परंतु त्यानंतर काय करणार याचाही विचार त्याने केला आहे. दोहा येथे डायमंड लिगसाठी नीरज दाखल झाला आहे आणि त्यावेळी त्याने क्रिकेटपटू बनण्याबद्दल जोक केला. हरयाणात क्रिकेट पाहत लहानाचा मोठा झालेल्या नीरजला भारतात क्रिकेटचं किती वेड आहे याची कल्पना आहे. भालाफेकीतून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेटपटू बनणार का असा सवाल नीरजला केला गेला अन् त्यावर टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने मजेशीर उत्तर दिले. फक्त त्याने एक अट ठेवली, की गोलंदाजी करताना हात बेंड करण्याचा नियम त्याच्यासाठी नसावा.
ICC च्या नियमानुसार चेंडू फेकणे हे चुकीचे आहे. ''क्रिकेट हाही शारीरिक तंदुरुस्तीचा खेळ आहे. खांद्यापासून हात वाकवण्याचा नियम बदलला आणि त्यांनी मी जसा भाला फेकतो अशी चेंडू फेकण्याची मुभा दिली, तर मी क्रिकेटपटू बनण्याचा विचार करू शकतो,''असे नीरज म्हणाला.