Neeraj Chopra on Pakistan Arshad Nadeem, Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्यानीरज चोप्राने रौप्यपदकाची कमाई केली. पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि भारताचानीरज चोप्रा अशी सुवर्णपदकासाठी थेट लढत गुरुवारी रात्री रंगली. त्यात पाकिस्तानच्या अर्शद नदीमने बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्रा याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात ९०.४५ मीटर लांब भालाफेक केली. ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी होती. पण पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर लांब अंतरावर भाला फेकत ऑलिम्पिक रेकॉर्ड सेट केला आणि सुवर्णपदक आपल्या नावे केले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटरसन याने ८८.५ मीटर कामगिरीसह कांस्यपदकावर नाव कोरले.
पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे जानेवारी महिन्यात नवा भाला घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यानंतर अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला आर्थिक मदत केली. त्या मदतीचे त्याने चीज केले. पाकिस्तानला ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून देत त्याने मोठा पराक्रम केला. त्याच्या विजयानंतर, नीरज चोप्रानेही अर्शदच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली.
"मी अर्शद नदीमसोबत २०१६ पासून स्पर्धा करतो आहे. आम्ही दोघे एकमेकांविरोधात गेली ८ वर्षे खेळतो आहोत. आम्ही एकमेकांचा खेळ जवळून पाहिला आहे. हे पहिल्यांदाच घडले की मी एखाद्या स्पर्धेत अर्शदकडून पराभूत झालो. पण या विजयाचे श्रेय अर्शदला नक्कीच दिले जायला हवे. यंदाच्या स्पर्धेत अर्शद माझ्यापेक्षा चांगला खेळला हे मी मान्य करतो. अर्शद या सामन्यासाठी खूप परिश्रम घेत होता. त्याने त्याची कामगिरी सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याचे मनापासून अभिनंदन," असे नीरज चोप्रा सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
दरम्यान, १४० कोटी भारतवासीयांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन नीरज चोप्रा भालाफेक करण्यासाठी मैदानात उतरला होता. मैदानी क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले गोल्ड मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राला यंदाच्या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्ण कामगिरी करण्याची संधी होती. तमाम भारतीयांनाही तीच आशा होती. पण अखेर त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.