नवी दिल्ली: अमेरिकेतील युजीन येथे सुरू असलेल्या विश्व ॲथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदकाची तयारी करीत असलेला भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा याने कडवे आव्हान असल्याची कबुली दिली. येथे ८९ मीटर भालाफेक करणारे किमान सहा प्रतिस्पर्धी असल्याने पदकविजेती कामगिरी सोपी असणार नाही. त्याचवेळी यंदा ९० मीटरचे लक्ष्य असल्याचे नीरजने म्हटले आहे. हायमंड लीगमध्ये नीरज या लक्ष्याच्या जवळपास पोहोचला होता.
या सत्रात नीरजने वैयक्तिक कामगिरीत सुधारणा केली. १४ जूनरोजी फिनलॅन्ड येथे ८९.३० मीटर आणि ३० जूनरोजी प्रतिष्ठेच्या डायमन्ड लीगमध्ये ८९.९४ मीटर अशी कामगिरी केली. तो अमेरिकेचा विश्वविजेता ॲन्डरसन पीटर्सपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर होता. पीटर्सने ९०.३१ मीटर्स अशा कामगिरीसह सुवर्ण जिंकले. २१ जुलै रोजी सुरू होत असलेल्या विश्व स्पर्धेच्या भालाफेकीबाबत नीरज म्हणाला,‘सहाजण प्रत्येकवेळी ८९ मीटर भालाफेक करीत असल्याने येथे कडवे आव्हान असेल.
मी यंदा ९० मीटरचे लक्ष्य पुढे ठेवले आहे. यंदा हे लक्ष्य गाठणारच. स्पर्धेत मी लक्ष्य गाठण्यासह शंभर टक्के कामगिरीवर भर देणार आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू येथे असल्याने सरावात कुठलीही कसर शिल्लक राखायची नाही, यावर भर देत आहे. माझी स्पर्धा स्वत:शी असल्याने स्वत:ला आणखी उत्कृष्ट बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. ’
भालाफेकीतील नीरजची प्रेरणा असलेला झेक प्रजासत्ताकचा विश्वविक्रमी यान जेलेनी हा देखील युजीनमध्ये उपस्थित आहे. नीरजने जेलेनीची भेट घेतली. त्याची भेट घेतली की प्रेरणा लाभते, असे नीरज म्हणाला. नीरजने खेळाचे पोषाख बनविणाऱ्या ‘अंडर आर्मर’ कंपनीशी करार केला आहे. नीरज हा या ब्रॅन्डचा भारतातील दूत असेल.