CWG 2022 | नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेला सुरूवात होण्याच्या दोन दिवस आधीच भारताला मोठा झटका बसला आहे. भारताचा दिग्गज ॲथलीट आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा (Neeraj Chopra)राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. नीरज चोप्राला पायाच्या दुखापतीमुळे आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. विशेष म्हणजे दुखापत जास्त असल्यामुळे त्याला जवळपास १ महिना मैदानातून बाहेर राहावे लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियन दरम्यान भारताच्या चॅम्पियनला दुखापत झाली होती. या चॅम्पियनशिपमध्ये नीरजने भारताचा १९ वर्षांचा दुष्काळ संपवून रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
नीरज चोप्राला कशी झाली दुखापत? नीरज चोप्रा वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चौथ्यांदा भाला फेकत असताना त्याला दुखापत झाली. या चॅम्पियनशिपमधील त्याचा पहिला प्रयत्न फाउल ठरला होता. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८२.३९ मीटर भाला फेकला. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात नीरजने ८६.३७ मीटर लांब भाला फेकला. नंतर टाकलेला थ्रो नीरजला पदकासह एक गंभीर दुखापत देऊन गेला.
नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भाला फेकून रौप्य पदकावर आपले नाव कोरले. मात्र यादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली आणि राष्ट्रकुल स्पर्धेस त्याला मुकावे लागले. नीरज चोप्राचा पाचवा आणि सहावा थ्रो फाउल राहिला होता त्यामुळेच तो सुवर्ण पदकापासून वंचित राहिला. एका मुलाखतीत त्याने याचे कारण देखील सांगितले आहे. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने मी पाचव्या आणि सहाव्या थ्रो मध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही असे त्याने म्हटले होते.