ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं पुन्हा एकदा गोल्डन कामगिरी केली आहे. त्नीरज चोप्राने शनिवारी फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलं. नीरज चोप्राने येथे विक्रमी ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकला आणि त्याची बरोबरी कोणी करू शकले नाही. काही दिवसांपूर्वी नीरज चोप्रानेही राष्ट्रीय विक्रमही केला होता.
नीरज चोप्रानं आपल्या पहिल्याच संधीत ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकला. याच्या आसपासही कोणी पोहोचू शकलं नाही. त्यानंतर त्यानं आपल्या नावे छोटा स्कोअर येऊ नये यासाठी पुढील दोन्ही संधीत फाऊल केलं. यादरम्यान, नीरज चोप्राला दुखापतही झाली. ज्यावेळी तो भाला फेकण्यासाठी गेला, तेव्हा त्याचा पाय घसरला. परंतु यातूनही तो उठून पुन्हा सज्ज झाला. दरम्यान, यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनीदेखील त्याचा एक व्हिडीओ ट्वीट करत कौतुक केलं आहे.