दोहा - भारताचा स्टार अॅथलिट नीरज चोप्रा याने या सत्रातील पहिल्या डायमंड लीग सिरीज स्पर्धेत ८७.४३ मीटर अंतरावर भालाफेक करत आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. मात्र तो या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला.राष्ट्रकुल स्पर्धेत ८६.४७ मीटरचे अंतर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजच्या समोर आॅलिम्पिक विजेता थॉमस रोहलर, विश्व विजेता जोहानेस वेट्टर आणि आंद्रियास हाफमन या सारखे महारथी होते. हे सर्व खेळाडू ९० मीटरपर्यंत भालाफेक करतात. नीरजने २०१७ लंडन विश्व चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता जेकब वादलेचिज याला मागे टाकले. तो पाचव्या स्थानावर राहिला.नीरजच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहे. त्याने ८१.१७ मीटरने सुरुवात केली. त्यानंतर ८७.७८ मीटर भालाफेक केली. त्याचे पुढचे तीनही प्रयत्न फाऊल ठरले. सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नात त्याने ८१.०६ मीटर अंतरावर फेकला.रोहलर याने ९१.७८ मीटर सोबत सुवर्णपदक पटकावले. तर वेट्टर याने ९१.५६ मीटरवर भालाफेक करत रौप्य आणि हाफमनने ९०.०८ मीटर सोबत कांस्यपदक पूर्ण केले.नीरजने आता २६ मे ला डायमंड लीग सिरीजच्या दुसºया फेरीत सहभागी होणार आहे. त्यात त्याचा सामना याच खेळाडूंसोबत होईल.नीरज चोप्रा याच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहे. ही बाब त्याच्या खेळासाठी महत्त्वाची आहे. त्याचा सामना सध्या ९० मीटर क्लब मध्ये असलेल्या खेळाडूंसोबतच होत आहे.
नीरज चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम, ८७.४३ मीटर अंतरावर केली भालाफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:58 AM