नवी दिल्ली : दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांची बीसीसीआयने सोमवारी भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा पथकाच्या (एसीएसयू) मुख्य सल्लागारपदी वर्षभरासाठी नियुक्ती केली. आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘आम्ही नीरज कुमार यांना एसीएयूचे मुख्य सल्लागार नेमले आहे . त्यांचा कार्यकाळ वर्षभराचा असेल.’’ कुमार यांच्याच नेतृत्वात दिल्ली पोलिसांनी माजी कसोटी गोलंदाज एस. श्रीसंत, स्पिनर अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना आयपीएलदरम्यान राजस्थान रॉयल्सकडून खेळताना स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक केली होती. याआधी रवी वसानी हे एसीएसयूचे प्रमुख होते. त्यांचा कार्यकाळ संपला आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली आणि संघाचे संचालक रवी शास्त्री यांनीदेखील बैठकीला हजेरी लावली.
नीरज कुमार एसीएसयूचे मुख्य सल्लागार
By admin | Published: April 21, 2015 12:40 AM