स्टॉकहोम : ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा याने गुरुवारी प्रतिष्ठेच्या डायमंड लीग ॲथ्लेटिक्स स्पर्धेच्या भालाफेकीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत रौप्यपदक जिंकले.मात्र तो ९० मीटर भालाफेक करण्यापासून थोड्या फरकाने वंचित राहिला. यंदा ही कसर भरून काढण्याचा विश्वास नीरजने व्यक्त केला आहे. डायमंड लीगमध्ये नीरज प्रथमच आघाडीच्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला.२४ वर्षांच्या या खेळाडूने पहिल्या प्रयत्नांत ८९.९४ मीटर भालाफेक करीत याआधीच्या ८९.३० मीटर या राष्ट्रीय विक्रमात सुधारणा केली. ग्रेनेडियन भालाफेकपटू अँडरसन पीटर्सने ९०.३१ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले. १४ जून रोजी फिनलॅन्डच्या तुर्कू शहरात पावो नुर्मी क्रीडा स्पर्धेत त्याने दुसरे स्थान पटकाविले होते. काल नीरजने ८४.३७, ८७.४६, ८४.७७,८६.८७ आणि ८६.८४ मीटर असेही प्रयत्न केले. नीरज सातवेळा डायमंड लीगमध्ये सहभागी झाला आहे. २०१७ मध्ये तीनवेळा, तर २०१८ मध्ये चारवेळा सहभाग घेतला होता.‘पहिला प्रयत्न फारच चांगला झाला. पहिल्याच प्रयत्नात काही मिळवायचे असते, असे मुळीच नाही. मी ९० मीटरच्या फारच जवळ होतो. हे अंतरदेखील पार करेन, असे वाटत होते. तरीही आपण सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याचा आनंद आहे.’- नीरज चोप्रा
डायमंड लीग : नीरजची १५ दिवसात दुसऱ्यांदा नव्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी, भालाफेक प्रकारात ऐतिहासिक रौप्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 2:25 PM