नवी दिल्ली : ऑलिम्पिक आणि विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने १२ ते १५ मे दरम्यान भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. यासह तब्बल तीन वर्षांनंतर हा स्टार खेळाडू पहिल्यांदाच देशांतर्गत स्पर्धेत खेळेल. २६ वर्षांचा हा स्टार खेळाडू १० मे रोजी प्रतिष्ठित डायमंड लीग सिरीजच्या दोहा येथे होणाऱ्या पहिल्या टप्प्यात आपल्या सत्राची सुरुवात केल्यानंतर भारतात परतण्याची शक्यता आहे.
भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने ट्वीट केले की, ‘नोंदीनुसार नीरज चोप्रा आणि किशोर कुमार जेना हे भुवनेश्वरमध्ये १२ मेपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होतील.’ नीरजचे प्रशिक्षक क्लाउच बार्टोनिट्ज यांनीही नीरज भुवनेश्वरमधील स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे सांगितले. हांगझोउ आशियाई स्पर्धेत रौप्य जिंकणारा २८ वर्षीय किशोर जेन हाही १० मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये खेळेल.
नीरजने याआधी १७ मार्च २०२१ रोजी देशांतर्गत स्पर्धेत सहभाग घेतला होता. तेव्हा त्याने ८७.८० मीटर भाला फेकून सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.