धरमशाला : वेगवान गोलंदाज पॉल वॅन मिकेरेन याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना नेदरलँडला टी-२० विश्वचषक पात्रता फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध १२ धावांनी विजय मिळवून दिला. दोन्ही संघांची आव्हाने संपुष्टात आल्यानंतर केवळ औपचारिकता राहिलेल्या या लढतीत पावसाने व्यत्यय आणल्याने प्रत्येकी ६ षटकांचा सामना खेळविण्यात आला.एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडने नेदरलँड्सला फलंदाजीस निमंत्रित केले. मात्र, या वेळी आलेल्या पावसाने सुमारे २ तास ४० मिनिटांची दीर्घ खेळी करीत सामन्यात व्यत्यय आणला. यानंतर प्रत्येकी ६ षटकांच्या झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने ५ बाद ५९ धावांची आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडने ६ षटकांत ७ बाद ४७ अशी मजल मारली. मिकेरेनने २ षटकांत केवळ ११ धावांच्या मोबदल्यात ४ फलंदाज माघारी धाडून आयर्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. रोल्फ वॅन डेर मर्व्ह यानेही ३ धावांत २ बळी घेत मिकेरेनला चांगली साथ दिली. पॉल स्टर्लिंगने (१५) आयर्लंडकडून एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी, सलामीवीर स्टिफन मायबर्ग (१८ चेंडंूत २७ धावा) आणि कर्णधार पीटर बॉरेन (९ चेंडंूत १४ धावा) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर नेदरलँड्सने आव्हानात्मक मजल मारली. जॉर्ज डॉकरेलने अचूक मारा करताना २ षटकांत ७ धावा देताना ३ बळी घेत नेदरलँड्सला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. (वृत्तसंस्था)
औपचारिक लढतीत नेदरलँड्सची बाजी
By admin | Published: March 14, 2016 12:54 AM