ढाका : टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारतीयहॉकी संघ मंगळवारपासून रंगणाऱ्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत सलामीला कोरियाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाईल. यासह भारतीय हॉकीपटू नव्या मोसमाची सकारात्मक सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील, तसेच यावेळी संघातील अनेक युवा खेळाडूंवर लक्ष असेल.
२०११ सालापासून सुरुवात झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत तीनवेळा जेतेपद पटकावले आहे. १४ डिसेंबरला भारतीय संघ कोरियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार असून यानंतर १५ डिसेंबरला यजमान बांगलादेशविरुद्ध भिडेल. कर्णधार मनप्रीत सिंगने सांगितले की, ‘कोरिया खूप चांगला संघ असून आमच्या आक्रमणाचा वेग कमी करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. याच ठिकाणी आम्ही २०१७ साली आशिया चषक स्पर्धेत कोरियाविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत राखला होता. त्यामुळेच आम्हाला सावध राहून पाया मजबूत करण्याची गरज आहे.’ या स्पर्धेविषयी मनप्रीत म्हणाला की, ‘टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतरची ही आमची पहिलीच स्पर्धा आहे. आमच्यासाठी ही नव्या सत्राची सुरुवात आहे. विजयाने सुरुवात केल्यास आमचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला जाईल.’
या स्पर्धेत भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. याविषयी मनप्रीत म्हणाला की, ‘गेली दोन वर्षे आमचे लक्ष ऑलिम्पिक स्पर्धेवर होते. त्यामुळे मुख्य संघात आम्ही फारसे बदल केले नव्हते. यामुळे युवा खेळाडूंपैकी काहींना संधी मिळाली नव्हती. हे सर्व युवा खेळाडू खूप मेहनत घेत असून सर्वांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे.’ गेल्यावर्षी मस्कट येथे झालेल्या स्पर्धेत जोरदार पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नव्हता, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेतेपद बहाल करण्यात आले होते.
भारताचे साखळी सामने
- १४ डिसेंबर कोरिया
- १५ डिसेंबर बांगलादेश
- १७ डिसेंबर पाकिस्तान
- १९ डिसेंबर जपान
- २१ डिसेंबर उपांत्य फेरी
- २२ डिसेंबर अंतिम सामना