मनोज रमेश जोशी, वृत्तसंपादक
जगभरातील टेनिसच्या चाहत्यांना जल्लोष करण्यासाठी नवे कारण मिळाले आहे. यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला नवे राजा आणि राणी मिळाले आहेत. स्पेनचा कार्लोस अल्काराझ आणि मार्केटा यांच्या रूपाने विम्बल्डनला नवे विजेते मिळाले आहेत. दोघांनाही जोडणारा एक समान धागा आहे. तो म्हणजे, टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर. त्याच्याचप्रमाणे दाेघेही नवविजेते टेनिसच्या विश्वात उत्तुंग भरारी घेतील, असा टेनिसप्रेमींना विश्वास आहे.
विम्बल्डनचे विजेतेपद पटकाविताना कार्लाेसने गतविजेता नाेवाक जाेकाेविचला चांगलाच घाम गाळायला लावला. कार्लाेसने जाेकाेविचचा विम्बल्डनमध्ये सलग ३४ सामने जिंकण्याचा विक्रमही माेडला. जाेकाेविच २०१८ पासून सलग चार वेळचा विजेता हाेता. अवघ्या वीस वर्षांच्या कार्लाेसने गतवर्षी अमेरिकन ओपन जिंकून जगाचे लक्ष वेधले होते.
कार्लोस आहे तरी कोण?
कार्लाेसची कामगिरी पाहिल्यास लक्षात येईल की, टेनिसच्या काेर्टावर एक माेठा खेळाडू आकार घेताेय. यावर्षी मार्च महिन्यात जाेकाेविचला मात देऊन ताे एटीपी क्रमवारीत पहिल्यात स्थानी आला हाेता. जाेकाेविचपेक्षा तब्बल १६ वर्षांनी ताे लहान आहे. अवघ्या ५ वर्षांत त्याने दाेन ग्रॅंडस्लॅमला गवसणी घातली.
खेळतो कसा? कार्लोसचा खेळ
आक्रमक आहेच, शिवाय त्यात संयमाचा मिलाफ दिसून येतो. म्हणजेच, टेनिसच्या दोन अव्वल खेळाडूंची झलक दिसते. पहिला त्याच्याच देशाचा राफेल नदाल आणि दुसरा म्हणजे लहानपणापासून ज्याला खेळताना पाहत मोठा झाला तो रॉजर फेडरर. संपूर्ण कोर्ट व्यापण्याची नदालची कला आणि फेडररचे पदलालित्य कार्लोसच्या खेळात दिसते. फेडररचा तर तो मोठा फॅन आहे.
दुखापतींना पुरून उरणारी मार्केटा... जन्म – २८ जून १९९९
या वर्षीच्या विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवून मार्केटा वॉन्ड्रूसोवा हिने सर्वांना चकित केले. कारण गतविजेती एलेना रेबाकिना आणि जागतिक क्रमवारीतील नंबर १ असलेली इगा स्वियाटेक यांच्याकडे स्पर्धेच्या सुरुवातीपासून संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. मात्र, मार्केटाने अफलातून खेळ करत विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच बिगर मानांकित खेळाडू ठरली आहे.
कोण आहे मार्केटा?
ती रँकिंगमध्ये मागे असली तरी तिच्या नावे २०२१च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रजतपदक आहे, तसेच ती २०१९मध्ये फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरित पोहोचली होती. चेक प्रजासत्ताकमध्ये जन्मलेली मार्केटा अतिशय जिद्दी आणि चिवट खेळाडू आहे. तिच्या मनगटावर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर वर्षभरातच विम्बल्डनसारखी स्पर्धा जिंकून जगाला आपली क्षमता दाखवून दिली. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती. तिचा गेल्या वर्षीच स्टेपन सायमेक यांच्यासोबत विवाह झाला. दुखापतीतून सावरताना तिला पतीची साथ खूप मोलाची ठरली.
कशी खेळते?
मार्केटाला मनगटाच्या दुखण्याने बरेच सतावले होते. याशिवाय कणखर मानसिकतेचा अभाव असल्याने ती मोठ्या स्पर्धांमध्ये यशस्वी ठरली नव्हती. मात्र, कठोर परिश्रमाने तिने त्यावर मात केली. प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस भेदण्याची उत्तम क्षमता, हे तिच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे. पदलालित्य आणि अतिशय वेगाने काेर्ट व्यापण्याची क्षमता, यामुळे प्रतिस्पर्ध्याला संधी कमी मिळते.