पणजी : फुटबॉल महासंघाची स्थापना १९३७ मध्ये झाली. तेव्हापासून आम्ही विविध सुधारणांचा प्रयत्न करीत आहोत. या गेल्या ८० वर्षांत आम्ही नवीन बदल घेऊन आलो आहोत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा नवा ‘लोगो’ हा परिवर्तनाचा संदेश देत आहे. आम्ही सुधारणा स्वीकारत असून त्या अमलात आणत आहोत, असे एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.एआयएफएफच्या नव्या लोगोचे अनावरण फिफा अध्यक्ष जियानी इन्फेन्टीनो यांच्या हस्ते झाले. त्या वेळी पटेल यांनी एआयएफएफच्या कामगिरीची माहिती दिली. पटेल म्हणाले, या लोगोमध्ये राष्ट्रध्वज ठळकपणे दाखविण्यात आला आहे. वरच्या भागावर ‘इंडिया’ असे लिहिले आहे. चक्राच्या जागी फुटबॉल दाखविण्यात आला आहे. फुटबॉलप्रती भारतीयांची आस्था स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, फिफा अध्यक्ष जियानी यांनी या लोगोचे कौतुक केले. ते म्हणाले, या लोगोतून भारताच्या प्रतिनिधित्वाचे महत्त्व स्पष्ट होते. भारतात फुटबॉल लोकप्रिय आहे. हा खेळ भारतात नंबर वन होईल, असा विश्वास आहे. फिफा अध्यक्षांच्या उपस्थितीत करण्यात आलेले नव्या लोगोचे अनावरण भारतीय फुटबॉलसाठी खूप मोठी प्रेरणा देणारे आहे. या वेळी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष शेख सलमान बिन इब्राहिम उपस्थित होते.(क्रीडा प्रतिनिधी)महत्त्वपूर्ण बैठकआशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. देशात फुटबॉलच्या विकासावर सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये क्लब लायसन्स, स्पर्धा, मानांकन आणि पंच या बाबींचा विकास हा महत्त्वाचा मुद्दा होता. यासंदर्भात, एएफसीचे महासचिव दातो विंडसर जान म्हणाले की, एएफसीने काही अशा गोष्टींकडे लक्ष वेधले ज्यामुळे भारतात फुटबॉल विकासास मदत होईल. लीग फुटबॉल स्पर्धेवर अधिक भर देण्यात आला. प्रस्तावित लीगच्या रचनेबाबत एआयएफएफच्या योजनेवर पुन्हा चर्चा करण्यात आली.मात्र, या प्रकरणात एएफसीची बाजू स्पष्ट आहे. लीगच्या रचनेबाबतचा निर्णय एआयएफएफच्या कार्यकारी समितीला घ्यावा लागेल, एएफसीला नाही. त्यामुळे एआयएफएफची कार्यकारी समिती काय ठरवते, याकडे लक्ष असेल.
नवा लोगो देतोय परिवर्तनाचा संदेश!
By admin | Published: September 29, 2016 4:27 AM