स्वदेश घाणेकर, मुंबई गतविजेता एवान्स रुटो, हेनरी सुगूट, लुक किबेट, मिचेल मुताई, बेनार्ड रोटीच यासारख्या तगड्या प्रतिस्पर्धकांना माघारी टाकत १२व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या इथोपियाच्या तेस्फाये अबेरा याने जेतेपद पटकावले. जेतेपद राखण्यासाठी कंबर कसून तयार असलेल्या रुटोला २ तास ९ मिनिटे व ४६ सेकंदांची वेळ नोंदवून अबेराने पिछाडीवर टाकले. महिला गटात इथोपियाच्या दिनकेश मेकाश हिने जेतेपद कायम राखले. पुरुष गटात नवा गडी जेता बसना असला तरी स्पर्धेवर इथोपियाच्या खेळाडूंनीच राज्य गाजवले. छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून सुरू झालेल्या या शर्यतीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच धावपटू पाहून खेळाडूंसह उपस्थितीतांचा उत्साहही ओसरला. शर्यतीच्या सुरुवातीपासून केनियाच्या मिचेल मुताई, युगांडाच्या एजेकेईल चेप्कोरोम आणि रशियाच्या सिबुसिसो न्झिमा यांनी आघाडी घेतली होती. सीएसटी ते चर्चगेटपासून ते बाबूलनाथ मंदिरापर्यंत या तिघांनी आघाडी कायम राखली होती. १५ किलोमीटरचे अंतर पूर्ण होताच या तिघांमध्ये केनियाच्या लुक किबेट याने एन्ट्री घेतली. सिबुसिसोचा वेग हळूहळू मंदावला आणि तो अव्वल तीन खेळाडूंच्या शर्यतीतून बाद झाला. २० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी या खेळाडूंनी एक तास ५ मिनिटे आणि ४ सेकंदांची नोंद केल्यामुळे आज नवा विक्रम बनत नाही याची खात्री सर्वांना झाली होती. राजीव गांधी सागरीसेतूकडे स्पर्धकांची आगेकूच होताना बदल होत गेले. मुताई आणि चेप्कोरोम यांना पिछाडीवर टाकत इथोपियाच्या डेरेजे डेबेले आणि अबेरा यांनी आघाडी घेतली. २७ किलोमीटरपर्यंत डेबेले, अबेरा आणि किबेट यांच्यात चुरस पाहायला मिळत होती. त्यांच्यासोबत इतर धावपटूही होतेच. परतीच्या मार्गावर स्पर्धकांच्या क्रमवारीत अचानक बदल घडला आणि सर्व धावपटू पिछाडीवर पडले आणि डेबेले, अबेरा व किबेट हेच आघाडीवर आले. त्यांच्या जवळपास एकही धावपटू अंतिम रेषेपर्यंत फिरकला नाही. अर्थात त्यांना हौशी धावपटूंच्या अडथळ्याचा सामना करावा लागला. गिरगाव चौपाटीकडे हे त्रिकुट आगेकूच करीत असताना अबेराने धावगती वाढवली आणि डेबेले व किबेटला कोसो दूर टाकत विजयाकडे आगेकूच केली. अबेराने २ तास ९ मिनिटे आणि ४६ सेकंदांची वेळ नोंदवले़ त्यापाठोपाठ ४४ सेकंदांनंतर डेबेले आणि १ मिनिट ११ सेकंदांनंतर किबेटने शर्यत पूर्ण केली.
नवा गडी, जुनेच राज्य !
By admin | Published: January 19, 2015 3:54 AM