बर्मिंगहॅम : न्यूझीलंड संघाला आज (शुक्रवारी) गेल्या काही वर्षांतील आपल्या सर्वांत मजबूत वेगवान गोलंदाजी आक्रमणासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झालेल्या आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. आॅस्ट्रेलिया संघ जोश हेजलवूड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क व जेम्स पॅटिन्सन या वेगवान चौकडीच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या लढतीत विजयी सुरुवात करण्यास प्रयत्नशील आहे.उभय संघांत प्रेरणादायी कर्णधार आहेत. आॅस्ट्रेलिया संघ स्टीव्ह स्मिथवर, तर न्यूझीलंड संघ केन विलियम्सनवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. दोन्ही संघांत एकट्याच्या बळावर सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या काही दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे; पण वेगवान गोलंदाजीबाबत चर्चा करता आॅस्ट्रेलिया संघाचे पारडे वरचढ भासत आहे. आॅस्ट्रेलिया संघासाठी चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेणे सोपे नाही. कारण, वेळोवेळी या गोलंदाजांना दुखापतींना सामोरे जावे लागणार आहे. आॅस्ट्रेलिया संघात जॉन हेस्टिंग्सच्या रूपाने आणखी एक उपयुक्त वेगवान गोलंदाज आहे. त्याला इंग्लंडमधील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. अशा स्थितीत आॅस्ट्रेलिया संघ चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची जोखीम पत्करू शकतो. हेजलवूड, कमिन्स, स्टार्क व पॅटिन्सन यांच्याकडून आॅस्ट्रेलियाला १९७० च्या दशकातील अँडी रॉबर्ट््स, मायकल होल्डिंग, कोलिन क्राफ्ट आणि जोएल यांनी विंडीजला जसे यश मिळवून दिले होते, त्याप्रमाणे यशाची अपेक्षा आहे. या चार वेगवान गोलंदाजांच्या आव्हानाला सामोरे जाणे न्यूझीलंड संघासाठी आव्हान आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली. मार्टिन गुप्टील, कर्णधार विलियम्सन आणि अष्टपैलू कोरे अँडरसन यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंंकेविरुद्ध ३५७ धावांचे लक्ष्य जवळजवळ ४६ षटकांत पूर्ण केले होते. न्यूझीलंड संघाची भिस्त विलियम्सन व अँडरसन यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. कारण, गुप्टील व रॉस टेलर यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. न्यूझीलंड संघाची गोलंदाजीची भिस्त वेगवान गोलंदाज टीम साऊदी व ट्रेंट बोल्ट यांच्यावर अवलंबून आहे. अॅडम मिल्ने व कोलिन डी ग्रॅण्डहोम यांच्याकडूनही संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे. अँडरसन व जेम्स निशाम या अष्टपैलू खेळाडूंमध्ये न्यूझीलंड संघाचा समतोल साधला गेला आहे. आॅस्ट्रेलियाने मेलबोर्नमध्ये खेळल्या गेलेल्या अंंतिम लढतीत त्या पराभवाचा हिशेब चुकता केला होता. या दोन्ही सामन्यांत खेळणारे अनेक खेळाडू शुक्रवारी पुन्हा एकदा समोरासमोर असतील. (वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, अॅरोन फिंच, जॉन हेस्टिंग्स, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, ख्रिस लीन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स पॅटिन्सन, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा. न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), कोरे अँडरसन, टे्रंट बोल्ट, नील ब्रूम, कॉलिन डी ग्रँडहोमे, मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, मिशेल मॅक्क्लेनघन, अॅडम मिल्ने, जेम्स नीशाम, जीतन पटेल, ल्युक राँची, मिशेल सँटनर, टिम साऊदी आणि रॉस टेलर.
न्यूझीलंड-आॅस्ट्रेलिया काट्याची लढत
By admin | Published: June 02, 2017 12:58 AM