ऑनलाइन लोकमत
वेलिंग्टन (न्यूझीलंड), दि. २० - गोलंदाजी व फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवत न्यूझीलंडने वर्ल्डकपमधला सलग तिसरा विजय नोंदवला आहे. तर पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावलेल्या इंग्लंडचा किवींविरोधातही मानहानीकारक पराभव झाला आहे. पहिली फलंदाजी करणा-या इंग्लंडचा धाव अवघ्या १२३ धावांवर ३३.२ षटकांमध्ये आटोपला. तर न्यूझीलंडने अवघ्या १२.२ षटकांमध्ये दोन गडी गमावत हे उद्दिष्ट्य साध्य केले. साउदीने सात बळी घेत विश्वषचकामधल्या बळींच्या विक्रमाशी बरोबरी केली आणि इंग्लंडचे कंबरडे मोडले. ज्यो रूटच्या ४६ धावांचा अपवाद वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकला नाही.
साउदीने ९ षटकांमध्ये ३३ धावा देत ७ गडी बाद केले तर बोल्ट, मिल्न व व्हेटोरीने प्रत्येकी एक गडी टिपला. जिंकण्यासाठी ५० षटकांमध्ये अवघ्या १२३ धावा असताना न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज ब्रँडन मॅकलम इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. मॅकलमने अवघ्या २५ चेंडूंमध्ये ७७ धावा फटकावत इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. मॅकलमने या घणाघाती खेळीत ८ चौकार व ७ षटकार तडकावले आणि इंग्लंडची अवस्था दयनीय केली. स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात १८ धावा निघाल्या तर फिनच्या दोन षटकांमध्ये तब्बल ४९ धावांची लूट न्यूझीलंडने केली. अ गटामध्ये आता श्रीलंका, स्कॉटलंड व इंग्लंडला नमवणारा किवींचा संघ अव्वल स्थानावर आहे.