न्यूकेकोहे : भारतीय महिला हॉकी संघाला पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत मंगळवारी यजमान न्यूझीलंडविरुद्ध ८-२ ने पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडतर्फे अनुभवी स्ट्रायकर स्टासे मिशेलसेनने (२१, ३० व ४२ वा मिनिट) तीन तर सामंथा हॅरिसनने (३ रा व ५६ वा मिनिट) दोन, कस्टर्न पीयर्स (५२ वा मिनिट), मेडिसन डोअर (५६ वा मिनिट) आणि स्टेफनी डिकिंस(६० वा मिनिट) यांनी गोल नोंदवले. भारताने सुरुवात चांगली केली, पण त्यानंतर न्यूझीलंड संघाने त्यांना बॅकफुटवर ढकलले. सामंथाने तिसऱ्या मिनिटाला गोल नोंदवला. भारतीय संघाच्या बचाव फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही तर आघाडीच्या फळीनेही अनेक संधी गमावल्या. पहिल्या क्वार्टरमध्ये १-० ने आघाडी घेतल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आघाडी ३-० अशी केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यावर गोलची नोंद झाली नाही. भारतातर्फे पहिला गोल ४० व्या मिनिटाला लिलिमाने नोंदवला. अनुपाने त्यानंतर ९ मिनिटांनी भारतातर्फे दुसरा गोल नोंदवला. त्यानंतर भारतीय संघाला गोल जाळ्याचा वेध घेता आला नाही. अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताची बचाव फळी दडपणाखाली आली. त्याचा किवी संघाने लाभ घेतला. उभय संघांदरम्यान तिसरी लढत १७ मे रोजी खेळली जाणार आहे. (वृत्तसंस्था)
न्यूझीलंडची भारतावर मात
By admin | Published: May 17, 2017 4:06 AM