ऑनलाइन लोकमत
वेलिंग्टन, दि. २२ - न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्लम येत्या फेब्रुवारीत क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी-सामान्यांच्या मालिकेनंतर आपण निवृत्ती पत्करणार असल्याची घोषणा मॅकलम याने आज केली. त्याच्या या निवृत्तीच्या निर्णयामुळे मार्चमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे नेतृत्व केन विल्यम्सन याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
मॅकलमने सलग दोन वर्ष न्युझीलंडचे कर्णधारपद यशस्वीरित्या भूषवले. त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यात आलेल्या २९ पैकी ११ सामन्यात न्युझीलंडने विजय मिळवला. सलग १०० कसोटी सामने खेळणारा मॅकलम हा एकमेव खेळाडू असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० फ्रेबुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे होणारी कसोटी म्हणजे त्याचा अखेरचा सामना असेल.
मॅकलमने ९९ कसोटीत ६,२७३ धावा केल्या असून ११ शतके व ३१ अर्धशतके ठोकली आहेत. तर २५४ एकदिवसीय सामन्यात ५ शतके व ३१ अर्धशतकांसह ५९०९ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा मॅकलम हा एकमेव फलंदाज असून त्याने गेल्यावर्षी वेलिंग्टन येथे भारताविरुद्धच्या कसोटीत ३०२ धावांची खेळी केली होती.