वेलिंग्टन : कंबरेच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेल्या ख्रिस गेलच्या फिटनेसबद्दल ‘तळ्यात मळ्यात’ असलेल्या वेस्ट इंडिज संघाला विश्वचषकाच्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज शनिवारी जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या न्यूझीलंडकडून कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.‘‘विजय मिळवायचा झाल्यास चुका टाळा’’ या गुरुमंत्रासह विंडीजला निर्धाराने मैदानात उतरावे लागणार आहे. न्यूझीलंडने अ गटात सर्व सहा सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली तर विंडीजला क गटात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. बाद फेरीच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात मात्र विंडीजच्या विजयात ख्रिस गेल याचीच भूमिका मोलाची ठरू शकेल. पण कर्णधार जेसन होल्डरने मात्र ख्रिस गेलच्या खेळण्याचा निर्णय सामन्याच्या दिवशी सकाळी होईल असे स्पष्ट केले. होल्डर म्हणाला,‘ गेलला इंजेक्शन देण्यात आले असून जखमेचे स्कॅनही झाले. याद्वारे मोठी समस्या नसल्याचे स्पष्ट झाल्याने उद्या तो खेळेल अशी आशा आहे.’गेलने या आठवड्यात काल पहिल्यांदा सराव केला. याशिवाय होल्डरने स्वत: गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. तसे पाहता विंडीजकडे गमविण्यासारखे काहीच नाही. दुसरीकडे सहयजमानपदाचे ओझे न्यूझीलंडवर असेल. साखळीत या संघाने देखणी कामगिरी बजावली होती. आॅस्ट्रेलियाविरुद्ध मिळविलेल्या विजयासह अन्य सामने जिंकण्यातही त्यांना त्रास जाणवला नव्हता.संघाला पुन्हा एकदा झकास सुरुवात करून देण्याची जबाबदारी कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम याच्या खांद्यावर असेल. आमचा संघ आक्रमक खेळ करेल, असे संकेत मॅक्यूलमने दिले आहेत. तो म्हणाला,‘ आतापर्यंत जो खेळ केला त्यानुसार मैदानावर कमाल करावी लागेल.’ यात यशाची खात्री नसते पण आम्ही नेहमीच दडपण झुगारून खेळतो. आक्रमकपणा आम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतो यावर माझा विश्वास आहे. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३० पासून खेळला जाईल.गेलने केला नेट्समध्ये सराव!विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याच्या खेळण्याबद्दल शंका असली तरी शुक्रवारी त्याने वेलिंग्टन मैदानावर जोरदार सराव केला. तो काही दिवसांपासून कंबरेच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळे साखळीतील अखेरच्या सामन्यात यूएईविरुद्ध खेळला नव्हता. न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामन्यात तो खेळल्यास त्याच्या आक्रमक फलंदाजीचा विंडीजला मोठा लाभ होऊ शकतो. पण त्याला खेळण्यास प्रवृत्त करणार नसल्याचे विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने सांगितले.
विंडीजपुढे न्यूझीलंडचे कडवे आव्हान
By admin | Published: March 21, 2015 1:07 AM