नवी दिल्ली : न्यूझीलंडसाठी भारत दौरा आव्हानात्मक ठरणार आहे. कारण वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या फिरोजशाह कोटलाच्या खेळपट्टीवर आज, शुक्रवारपासून मुंबईविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव सराव सामन्यात त्यांच्या फलंदाजांना फिरकीविरुद्ध खेळण्याची अधिक संधी मिळणार नाही. खेळपट्टीचे स्वरूप बघितल्यानंतर तीन दिवसीय सराव सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना सिनिअर खेळाडू रॉस टेलर म्हणाला,‘कोटलाच्या खेळपट्टीवर चेंडू अधिक वळणार नसल्याचे संकेत मिळत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत मात्र अशी परिस्थिती राहणार नाही, हे नक्की.’कोटलाच्या खेळपट्टीवर थोडी हिरवळ आहे. टेलरने कोटलाच्या खेळपट्टीचा उल्लेख करताना म्हटले की,‘कसोटी क्रिकेट कसे खेळल्या जाते त्याचा हा एक भाग आहे. तुम्ही न्यूझीलंडमध्ये आले असते तर यापेक्षा वेगळे नसते. आमच्या येथील खेळपट्टीवर थोडी हिरवळ असते. मायदेशात खेळण्याचा लाभ मिळत असतो. आम्हाला खेळपट्टी फिरकीला अनुकूल असण्याची आशा आहे. कसोटी मालिकेत कोटलाच्या खेळपट्टीप्रमाणे खेळपट्ट्या मिळणार नाहीत, हे नक्की.’ भारतात २०१२ मध्ये एकमेव कसोटी शतक झळकावणारा टेलर पुढे म्हणाला,‘विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान आम्ही दिल्लीत खेळलेल्या सामन्यातील खेळपट्टीवर अन्य स्थळांच्या तुलनेत अधिक हिरवळ होती. सराव सामना सराव सामना असतो. या लढतीच्या निमित्ताने भारतीय वातावरणासोबत जुळवून घेण्याची संधी मिळते. न्यूझीलंडच्या तुलनेत येथे अधिक उष्णता आहे. त्यामुळे सराव करणे चांगले आहे. मुंबईविरुद्धचा सराव सामना खडतर होण्याची आशा आहे.’रणजी चॅम्पियन मुंबई संघाला कसोटी संघाविरुद्ध खेळून मोसमाची चांगली सुरुवात करण्याची संधी आहे. अखिल हेरवादकर, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व धवल कुलकर्णी आॅस्ट्रेलियात भारत ‘अ’ संघासोबत आहेत. मुंबई संघाला त्यांची उणिव भासणार आहे, पण त्यामुळे त्यांना राखीव खेळाडूंची क्षमता तपासण्याची संधी मिळणार आहे. रोहित शर्मा दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत सहभागी झाला होता. तो या लढतीत खेळणार आहे. कर्णधार आदित्य तारेने न्यूझीलंड संघापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे. मुंबई संघाने यापूर्वीही दौऱ्यावर येणाऱ्या संघाला अडचणीत आणले आहे.मालिकेचा निकाल फिरकीपटूंवर अवलंबून : गंभीरनवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या आगामी तीन कसोटी सामन्यांचा निकाल फिरकीपटूंच्या कामगिरीवर अवलंबून राहील, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. मालिकेतील पहिली लढत २२ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळल्या जाणार आहे. यजमान संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघाला कमी लेखण्याची चूक करू नये. उभय संघांत दर्जेदार फिरीकपटूंचा समावेश असून मालिकेचा निकाल फिरकीपटू निश्चित करतील, असेही गंभीर म्हणाला.न्यूझीलंड संघ तुल्यबळ आहे. त्यांच्या संघात तीन फिरकीपटूंचा (मिशेल सँटनर, ईश सोढी आणि मार्क क्रेग) समावेश आहे. ज्या संघाचे फिरकीपटू चांगली कामगिरी करतील तो संघ मालिकेत बाजी मारेल.असेही गंभीरने यावेळी सांगितले.
न्यूझीलंड-मुंबई सराव सामना आजपासून
By admin | Published: September 15, 2016 11:34 PM