-सुनील गावसकर लिहितो़आनंद साजरा करण्याची संधी न्यूझीलंड स्वत: गमावत आहे. दौऱ्यावर आल्यापासून त्यांनी लय गमावली. पुढील १५ दिवसांनंतर मायदेशी परत जाण्याची वेळ असेल. हा संघ रिकाम्या हाताने परतणार का, असा प्रश्न पडतो. मैदानावर हा संघ प्रयत्नांत कमी पडत नाही. या संघात उच्च दर्जाचे खेळाडू आहेत, याबद्दल शंका नाही; पण फलंदाजीच्या वेळी खेळाडू चाचपडत आहेत. एखादा वयात आलेला मुलगा सुंदर मुलीला पहिल्यांदा भेटतो तेव्हा त्याची जशी त्रेधा उडते, तसा प्रकार न्यूझीलंडच्या फलंदाजांकडून होत आहे. त्यांचे फलंदाज अभावानेच स्थिरावताना दिसतात. ‘फूटवर्क’ हा मुख्य अडथळा आहे. त्यांनी २०० धावांत बाद व्हावे, असे धमरशालाच्या खेळपट्टीत काहीच नव्हते. महिनाभरापासून भारतात खेळणारा कुठलाही संघ उसळी आणि वळण घेणाऱ्या खेळपट्टीशी एकरूप होऊन जातो; पण न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळताना दिसत नाही. भक्कम पाया रचला जात नसल्याने संघाचा डोलारा कोसळताना दिसत आहे.मार्टिन गुप्तिल आणि जोस बटलर (इंग्लंड) हे क्रिकेटमधील दिग्गज स्ट्रायकर मानले जातात; पण गुप्तिल आल्यापासून चाचपडत आहे. भारतीय गोलंदाजांचा सामना करताना त्याला अद्यापही सूर गवसलेला दिसत नाही. रॉस टेलरबाबतही असेच घडले. एखाद्या खराब चेंडूवर हे फलंदाज बाद होताना दिसतात.केन विल्यम्सन याने नेतृत्वाची जाबाबदरी ओळखून फॉर्ममध्ये असलेला टॉम लेथम याच्यासोबत धावा काढण्याची जबाबदारी स्वीकारावी. कोरी अँडरसनकडूनही धावांची अपेक्षा बाळगता येईल. हे सर्व फलंदाज प्रभावशाली आहेत. त्यांची बॅट तळपल्यास भारतीय चाहत्यांनादेखील या खेळाडूंची फटकेबाजी पाहायला फार आवडेल. भारतीय संघ सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी करीत आहे. आश्विन आणि जडेजा तसेच मोहंमद शमी यांच्या अनुपस्थितीतही गोलंदाजी प्रभावी ठरत असून, धरमशाला येथे भारतीय खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या तुलनेत सरस होता. हार्दिक पंड्याने तीन बळी घेऊन पदार्पणात देखणी कामगिरी केली. नंतर विराट कोहलीने चौफेर फटकेबाजी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघ पुढील दोन सामने जिंकून मालिकेवर ताबा मिळविल्याशिवाय संघात फारसे बदल करणार नाही. सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करीत असल्याने न्यूझीलंडला सावरण्याची संधी न देता मालिका खिशात घालण्यास सज्ज आहेत. (पीएमजी)
न्यूझीलंड संघ चाचपडतो आहे!
By admin | Published: October 20, 2016 6:37 AM