ड्युनेडिन : न्यूझीलंडने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेरीस ३०८ धावांची भक्कम आघाडी घेऊन लंकेविरुद्ध पकड मिळविली आहे. न्यूझीलंडच्या ४७१ धावांच्या उत्तरात लंकेचा पहिला डाव २९४ धावांत आटोपला. १३७ धावांची आघाडी मिळविणाऱ्या न्यूझीलंडने दुसऱ्या डावात एक बाद १७१ अशी मजल गाठताच हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. आता केवळ पाऊसच न्यूझीलंडला विजयापासून दूर ठेवू शकेल.केन विल्यम्सनने वर्षभरात हजार धावांचा पल्ला गाठून ‘एलिट’ क्लबमध्ये सहभागी होण्याचा मान मिळविला. खेळ थांबला तेव्हा टॉम लेंथम ७२ आणि विल्यम्सन ४८ हे नाबाद होते. या दोघांनी आतापर्यंत दुसऱ्या गड्यासाठी ७९ धावांची भागीदारी केली. यंदा विल्यम्सनशिवाय अॅलिस्टर कुक, ज्यो रुट, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी एक हजार धावांचा टप्पा गाठला, हे विशेष. त्याआधी लंकेने ४ बाद १९७ वरून पुढे सुरुवात केली. दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर दिनेश चांदीमल (८३) बाद झाला. कितुविवान वितांग(२२), मिलिंद सिरीवर्धने (३५), रंगना हेरात (१५) यांनी बऱ्यापैकी योगदान दिले. टीम साऊदी आणि नील वेंगनर यांंनी न्यूझीलंडसाठी प्रत्येकी ३ गडी बाद केले. (वृत्तसंस्था) धावफलक : न्यूझीलंड : पहिला डाव सर्वबाद ४३१; श्रीलंका : पहिला डाव सर्वबाद २९४ - न्यूझीलंड : दुसरा डाव १७१/१; टॉम लॅथम ७२ नाबाद. मार्टिन गुप्टील ४६, केन विल्यमसन ४८ नाबाद, गोलंदाजी, रंगाना हेराथ १/३९.
न्यूझीलंडची लंकेविरुद्ध ‘पकड’
By admin | Published: December 13, 2015 2:28 AM