ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 22 - आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी आयोजित सराव सामन्यात नवख्या स्कॉटलंड संघाने बलाढय श्रीलंकेवर 43 चेंडू आणि सात विकेट राखून विजय मिळवला. मॅथ्यू क्रॉस आणि कायली कोइटझर स्कॉलंडच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांच्या शतकी खेळीने स्कॉलंडच्या विजयाचा पाया रचला. बेकेनहॅम मैदानावर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
सलामीवीर कुसल परेरा (57), कपूगेंद्रा (71) आणि दीनेश चंडीमल (79) यांच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने सर्वबाद 287 धावा केल्या. त्यानंतर मॅथ्यू क्रॉस नाबाद (106) आणि कोइटझर (118) यांनी पहिल्या विकेटसाठी 201 धावांची खणखणीत सलामी दिली. त्यानंतर क्रॉसने कॉन डी लांगेला नाबाद (19) साथीला घेत स्कॉटलंडच्या पहिल्या मोठया विजयावर शिक्कामोर्तब केले.
कोइटझरने आक्रमक फलंदाजी करताना 84 चेंडूत 118 धावा फटकावल्या. यात 15 चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. श्रीलंकेच्या तुलनेत स्कॉटलंडचा संघ कमकुवत समजला जातो. पण या विजयामुळे स्कॉलंडचा आत्मविश्वास नक्की उंचावला असणार. यापूर्वी सुद्धा वर्ल्डकपमध्ये अनेक नवख्या संघांनी दिग्गज संघांना पराभवाचे हादरे दिले आहेत. यापूर्वी 2015 च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेने स्कॉटलंडवर 148 धावांनी विजय मिळवला होता.