नवोदितांनी खेळात परिश्रम व सातत्य ठेवावे, पुर्णतः सप्लीमेंट्सवर अवलंबून न राहता सुरूवातीला नैसर्गिकपणे सुदृढ शरीरयष्टी कमावण्याकडे भर द्यावा, स्टेरॉईडयुक्त सप्लिमेंट्स टाळाव्यात, शासनमान्य फेडरेशनशनकडून खेळावे असा मौलिक सल्ला आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांनी दिला.
बॉडीबिल्डींग खेळाला ऑलिम्पिक पात्रता मिळाल्यास अनेक दृष्टीने नवोदितांना शासनसाहाय्य मिळू शकेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित गुरूवर्य स.वि.कुलकर्णी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांच्या मुलाखतीने गुंफले. ठाणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोशिएशनचे सचिव यतीन टिपणीस यांनी मुलाखत घेतली. एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा.तुषार चव्हाण यांनी निवेदन तर प्राचार्य डॉ.हेमंत चित्ते यांनी प्रास्तविक केले. प्रा. सिद्धी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर व्याख्यानमालेच्या नियोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान,सह-सचिव मानसी प्रधान, खजिनदार सतीश शेठ यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. १४ व्या वर्षापासूनच मी व्यायामावर भर दिला असला, घरात पोषक वातावरण असले तरीही या क्षेत्राकडे वळावे, अशी ओढ नव्हती. परंतू व्यायामशाळेतील सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर व्यायामशाळेतील अंतर्गत स्पर्धेत भाग घेऊन उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आणि तिथेच शरीरसौष्ठव होण्याची आंतरिक प्रेरणा जागृत झाली. शाळेत असताना सायकलचे पंक्चर काढण्याचे दुकान सांभाळून शाळा आणि नियमितपणे व्यायाम अशी तारेवरची कसरत करावी लागायची.
प्रत्येक खेळाडूसाठी खेळात सातत्य राखणे फार गरजेचे असते, प्रत्येक महिन्यात जवळजवळ १५ स्पर्धांमध्ये मी सहभागी व्हायचो, अशा शब्दांत त्यांनी आपला प्रवास उलगडला. या सातत्यामुळेच मि. एम्याच्यूर ऑलिम्पिया-चॕम्पिअन ऑफ चॕम्पिअन, मि.इंडीया, ऑल इंडीया रेल्वे बॉडीबिल्डींग महाराष्ट्र व मुंबई मि.एशिया, मि.वर्ल्ड आणि इतर अशी ५०० हून अधिक पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत. २०१८ साली बॉडीबिल्डींग क्षेत्रातील मानाचे प्रो-कार्डही त्यांना २०१८ मध्ये प्राप्त झाले आहे. सुरुवातीच्या उमेदीच्या काळात कोल्हापूरच्या कर्मयोगी विक्रमसिंह घाटगे यांनी आर्थिक मदत केली तसेच अजित पवार, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या सर्वपक्षीय नेत्यांनी वेळोवेळी आवश्यक मदत केल्यामुळेच मी इथवर पोहचू शकलो, असे ते म्हणाले. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांना त्यांनी मार्गदर्शन केले.