पोर्ट आॅफ स्पेन : भारत - वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसाचा व्यत्यत कायम राहिला. सुरुवातीपासूनच मैदान ओलसर राहिल्याने दुसऱ्या दिवशी विश्रांतीपर्यंत एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. यजमान विंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सावध सुरुवात केली. मात्र, इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी मोक्याच्यावेळी घेतलेल्या प्रत्येकी एका बळीने पहिल्या दिवशी विश्रांतीपर्यंत यजमानांनी २ बाद ६२ धावा अशी मजल मारली होती. यावेळी सुरु झालेल्या पावसामुळे पुढे एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. तर, दुसऱ्या दिवशी ओलसर मैदानामुळे खेळाला प्रारंभ झाला नाही.पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा सलामीवीर क्रेग ब्रेथवेट (नाबाद ३२) आणि अनुभवी मार्लोन सॅम्युअल्स (नाबाद ४) खेळपट्टीवर टिकून होते. विशेष म्हणजे श्रीलंकेने बलाढ्य आॅस्टे्रलियाला दिलेल्या ३-० अशा व्हाइटवॉश नंतर आॅसी संघाने आयसीसी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान गमावले. याचा फायदा टीम इंडियाने घेत अग्रस्थानी झेप घेतली. मात्र, आपले हेच अग्रस्थान कायम राखण्यासाठी भारताला विंडिजविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात विजय अनिवार्य आहे. परंतु, पावसाने केलेल्या व्यत्ययामुळे भारतापुढे विजयाचे आव्हान कठिण झाले आहे. तिसऱ्या कसोटीतही संपुर्ण एक दिवस पावसामुळे धुऊन गेल्यानंतरही भारताने गोलंदाजांच्या जोरावर बाजी मारताना चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. याच सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आता भारतापुढे आहे. (वृत्तसंस्था)धावफलक :वेस्ट इंडिज (पहिला डाव) : क्रेग ब्रेथवेट खेळत आहे ३२, लिआॅन जॉन्सन झे. रोहित गो. इशांत ९, डॅरेन ब्रावो त्रि. गो. अश्विन १०, मार्लेन सॅम्युअल्स खेळत आहे ४. अवांतर - ७. एकूण : २२ षटकात २ बाद ६२ धावा.गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ६-१-१३-०; मोहम्मद शमी ६-२-१४-०; इशांत शर्मा ५-३-७-१; रविचंद्रन अश्विन ५-१-२२-१.
दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार खेळी
By admin | Published: August 20, 2016 1:10 AM