लिली : यजमान फ्रान्सने रविवारी झालेल्या लढतीत बलाढ्य स्वित्झर्लंडला गोल शून्य बरोबरीत रोखून युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करताना ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. त्याच वेळी स्वित्झर्लंडनेही बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली. दखल घेण्याची बाब म्हणजे, स्वित्झर्लंडने पहिल्यांदाच युरो स्पर्धेची बाद फेरी गाठताना फ्रान्सकडून झालेल्या चुकांचा फायदा घेतला. स्वित्झर्लंडने ५ गुणांसह ‘अ’ गटात दुसरे स्थान मिळवले असून, यजमान फ्रान्स सर्वाधिक ७ गुणांसह अव्वल स्थानी आहे. आक्रमक सुरुवात झालेल्या या लढतीत फ्रान्सचा मिडफिल्डर पाउल पोग्बा आणि बदली खेळाडू दिमित्रि पाएट यांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र, स्विस बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. फ्रान्सने साखळी फेरीत दोन विजय मिळवले असून, एक बरोबरी साधली आहे. बाद फेरीत फ्रान्स तिसऱ्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध खेळेल. तर, स्विस संघाचा सामना ‘क’ गटाच्या उपविजेत्या संघाविरुद्ध होणार असून, यामध्ये पोलंड किंवा जर्मनीचा समावेश असू शकतो. (वृत्तसंस्था) स्ट्रायकर अर्मांडो साडिकूचा निर्णायक हेडरलिली : अल्बानियाने अनपेक्षित निकालाची नोंद करताना युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत तुलनेत बलाढ्य असलेल्या रोमानियाला १-० असा धक्का देत सनसनाटी निकाल नोंदवला. या शानदार विजयासह अल्बानियाने स्पर्धेची बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. त्याच वेळी केवळ एका गुणासह ‘अ’ गटात चौथ्या स्थानी असलेल्या अल्बानियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवातीनंतर गोल करण्याच्या संधी निर्माण करून सामन्यात रंग भरले. स्ट्रायकर अर्मांडो साडिकू याने पहिले सत्र संपण्याच्या तीन मिनिट अगोदर केलेल्या अप्रतिम हेडरच्या जोरावर अल्बानियाने १-० अशी जबरदस्त आघाडी घेतली. या आघाडीच्या जोरावर मध्यंतराला वर्चस्व राखल्यानंतर अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखून अल्बानियाने बाजी मारली. दुसऱ्या सत्रात रोमानियाने पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र, भक्कम बचावाच्या जोरावर अल्बानियाने रोमानियाला यश मिळवून दिले नाही. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघांना बाद फेरीत प्रवेश मिळणार असल्याने अल्बानियाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. (वृत्तसंस्था)
यजमान फ्रान्स बाद फेरीत
By admin | Published: June 21, 2016 2:07 AM