स्वदेश घाणेकर, मुंबईपराभवाच्या सातत्यामुळे इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या मुंबई सिटीच्या मदतीला निकोलस अनेल्का धावून आला. केरळा ब्लास्टरविरुद्धच्या या लढतीत ४४व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकचा योग्य फायदा उचलत अनेल्काने पहिल्या गोलची नोंद करून मुंबईला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अनेल्काने आक्रमक खेळ करत ती अखेरपर्यंत कायम राखून स्पर्धेतील दुसरा विजयही मिळवून दिला. या संपूर्ण लढतीत अनेल्का विरुद्ध केरळाचा गोली संदीप नँडी असा रोमांचक मुकाबला डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज, रविवारी पाहायला मिळाला. नँडीच्या प्रयत्नांमुळे मुंबईला मोठा विजय मिळवणे शक्य झाले नाही. या विजयामुळे मुंबईने आठव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली. फर्स्ट फॉर अनेल्का एण्ड मुंबई मुंबई सिटीने सुरुवातीपासून आक्रमक खेळावर भर दिला. निकोलस अनेल्का आणि एण्ड्रे मॉरित्झ यांनी चेंडूवर ताबा ठेवत केरळा संघावर पुरेपूर दडपण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुण्याला त्यांच्याच मैदानावर पराभूत करून केरळाचा आत्मविश्वास वाढलेला होता आणि तो लढतीतही दिसला. मुंबईच्या प्रत्येक डावपेचावर त्यांच्याकडे उत्तर होते. अनेल्का आणि मॉरित्झ यांचे प्रयत्न सातत्याने सुरूच होते; परंतु त्यांना मिडफिल्डरकडून योग्य साथ न मिळाल्याने यश त्यांच्या वाट्याला येत नव्हते. केरळाच्या डिफेंडरने अनेल्काला ब्लॉक करण्याची आखलेली रणनीती यशस्वी ठरत होती. २२व्या मिनिटाला मुंबई गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मॉरित्झने केरळाचा बचाव भदून चेंडू गोलपोस्टजवळ नेला खरा; परंतु गोली संदीप नँडीने तो अडवून मुंबईची संधी हिरावून घेतली. प्रेक्षकांमधूनही मुंबईला प्रोत्साहन मिळत गेले आणि पहिल्या हाफच्या अगदी शेवटच्या मिनिटाला मुंबईचा खेळ उंचावला. ४२व्यास मिनिटाला मुंबईचा मिडफिल्डर जॉन स्तोहांजल याला बॉक्सनजीक इशफाक अहमद याने चुकीच्या पद्धतीने पाडले आणि मुंबईला फ्री किक बहाल करण्यात आली. अनेल्काच्या अनुभवाची कसोटी पाहणारी हिच ती वेळ. त्याने ३० यार्डवरून दमदार किक मारून चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला आणि स्पर्धेतील पहिल्या वैयक्तिक गोलची नोंद करून मुंबईला १-० असे विजयी आघाडीवर आणले.
मुंबईच्या मदतीला निकोलस
By admin | Published: November 03, 2014 2:23 AM