ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. 21 - दडपणामुळे मला त्या रात्री झोपच लागली नाही आणि मैदानात पाय ठेवल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या टी-२० लढतीत नाबाद अर्धशतकी खेळीत भारताला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत बरोबरी साधून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा युवा फलंदाज मनदीप सिंगने व्यक्त केली. सोमवारच्या लढतीत १०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मनदीपने नाबाद ५२ धावांची खेळी केली. फलंदाजीसाठी मैदानात पाय ठेवल्यानंतर दडपण कमी झाले, असे त्याने सांगितले. सामन्यानंतर बोलताना मनदीप म्हणाला, सामन्याच्या पूर्वीच्या रात्री मला झोप आली नाही. मालिका जिंकण्याचे विचार मनात घोळत होते. त्याचप्रमाणे निवड समितीचे आपल्यावर लक्ष आहे, हे तथ्यही नाकारता येत नाही. याला तुम्ही दडपण म्हणून शकता किंवा निराशा म्हणता येईल, पण फलंदाजीला गेल्यानंतर सर्व काही सुरळीत होते. किमान माझ्याबाबतीत हे लागू होते. त्यावेळी लक्ष्य केवळ १०० धावांचे असून ते कसे गाठता येईल, याचाच विचार होता. मैदानावर उतरल्यानंतर निवड समिती सदस्य मला बघत आहेत, याचा विचार मी करीत नाही. मालिका महत्त्वाची असल्यामुळे सामन्यापूर्वी अशा बाबी मनात घोळत असतात, पण मैदानात दाखल झाल्यानंतर सर्वकाही सुरळीत होते.मनदीप पुढे म्हणाला, पहिल्या टी-२० मध्ये धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर निकालापेक्षा केवळ कामगिरीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधता आली. निकालावर अधिक विचार करण्यापेक्षा कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. मालिका विजय मिळवण्यास उत्सुक असतो, पण नेहमी त्याचाच विचार केला तर दडपण येते.