Nikhat Zareen, Boxing World Championship : भारताची निकहत जरीन बनली वर्ल्ड चॅम्पियन; थायलंडच्या जितपाँग ज्युत्मासला ५-० असे नमवून घडवला इतिहास.. महिला वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेतील (IBA Women's World Boxing Championship) ५२ किलो वजनी गटात पटकावले सुवर्णपदक. या स्पर्धेतील भारताचे हे महिला गटातील एकूण १०वे सुवर्णपदक ठरले. मागील १४ वर्षांत मेरी कोमनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय बॉक्सर ठरली.
कोण आहे निकहत जरीन?तेलंगणाच्या निझामाबाद येथे १४ जून १९९६ साली निकहत जरीनचा जन्म झाला. मोहम्मद जमील अहमद हे तिचे वडील, तर परवीन सुल्ताना ही तिची आई. निझामाबाद येथील निर्माला हृदय गर्ल हायस्कूलमध्ये तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने B.A ची पदवी घेतली. २०२०मध्ये क्रीडा मंत्री व्ही श्रीनिवास गौड हिने तिला इलेक्ट्रीक स्कूटर व १० हजार रुपयांचे बक्षीस दिले होते.
२०११ तिने महिला युथ व ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर गुवाहाटी येथे झालेल्या इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले. २०१९मध्ये थायलंड ओपन स्पर्धेत रौप्य जिंकले. तिने 73rd Strandja Memorial Boxing स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने या स्पर्धेत उपांत्य फेरीत टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या तुर्कीच्या बज नाझला पराभूत केले होते. २०१७मध्ये तिच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि आज तिने सुवर्ण कामगिरी केली.