भारताची वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निखत झरीनला मोठी जबाबदारी मिळाली आहे. निखत झरिनने तेलंगणा पोलिसात पोलीस उपअधीक्षक (DSP) म्हणून पदभार स्वीकारला आहे. पोलीस महासंचालकांनी तिला नियुक्ती पत्र सुपूर्द केले. बुधवारी रात्री जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारने निखत जरीन हिची डीएसपी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले होते, त्यानंतर डीजीपी यांच्यामार्फत नियुक्ती पत्र सादर करण्यात आले. निझामाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेली निखत जरीनने दोन वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन असून राष्ट्रकुल, तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकही जिंकले आहे. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकही तिच्या नावावर आहे.
अलीकडेच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्येही तिचा सहभाग होता. मात्र, पदक जिंकण्यात निखतला अपयश आले. खरे तर निखतचा जन्म १४ जून १९९६ ला तेलंगणामधील निजामाबादमध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव मुहम्मद जमील अहमद आणि आईचे नाव परवीन सुल्ताना आहे. १३ वर्षांच्या वयातच निखतने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. निखतने दिग्गज बॉक्सर मेरी कोन हिच्याशीही अनेक वेळा बॉक्सिंग रिंगमध्ये दोन हात केले आहेत. निखत झरिनने कारकिर्दीतील पहिले पदक २०१० साली नॅशनल सब ज्युनियर मीट मध्ये मिळवलं होते. त्यानंतर वयाच्या १५व्या वर्षी निखतने देशासाठी गोल्ड मेडल मिळवले. तुर्कस्तानमध्ये २०११ साली महिला ज्युनिअर आणि युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने गोल्ड जिंकले होते.
तेलंगणाच्या डीजीपी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, दोन वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन राहिलेली आणि ऑलिम्पिक ॲथलीट निखत जरिनने पोलिस उपअधीक्षक म्हणून नवीन भूमिका स्वीकारल्याने आम्ही तिचे स्वागत करतो.