Archery World Cup, India wins Gold Medal: भारतीय महिला बॉक्सर निखत झरिन (Nikhat Zareen) हिने नुकतेच वर्ल्ड बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण विजयाचा भारतीय क्रीडा रसिकांकडून जल्लोष सुरू असतानाच भारतीय क्रीडापटूंनी आणखी एक सुवर्णपदक जिंकले. तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताच्या तिरंदाजांनी फ्रान्सपेक्षा सरस कामगिरी केली. २३२-२३० अशा अतिशय थोड्या फरकाने भारतीय तिरंदाजांनी विजय मिळवला आणि तिरंदाजीच्या संमिश्र प्रकारच्या स्पर्धेत (कंपाउंड) हे सुवर्णपदक जिंकले. देशासाठी हे सुवर्णपदक अमन सैनी, अभिषेक वर्मा आणि रजत चौहान यांनी मिळवले.
भारताकडून अमन सैनी, अभिषेक वर्मा आणि रजत चौहान या त्रिकूटाने दुसऱ्या लेव्हलमध्ये सुवर्णपदक जिंकले. या आधी पहिल्या लेव्हलमध्येही याच त्रिकूटाने सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला. महत्त्वाची बाब म्हणजे हा विजय मिळवल्यानंतर या त्रिकूटाने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केले.
सुरूवातीला पिछाडीवर असतानाही मिळवला विजय
भारतीय संघाने पिछाडीवर असताना दमदार कामगिरी करत सुवर्ण लक्ष्यभेद केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या फ्रेंच संघावर अटीतटीच्या स्पर्धेत विजय मिळवला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये भारतीय संघ फ्रेंच त्रिकुटापेक्षा पिछाडीवर होता, पण नंतर तिसऱ्या फेरीत त्यांनी अचूक लक्ष्य साधत फ्रान्सच्या आशा धुळीस मिळवल्या. दोन्ही संघांमधील विजयाचे अंतर केवळ २ गुणांचे होते.