मायदेशात होणार्या आगामी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे जगज्जेती, भारताची अव्वल बॉक्सर निखत झरीन हिने म्हटले आहे.
जागतिक बॉक्सिंग स्पर्धा नवी दिल्ली येथे मार्च महिन्यात होईल. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी उत्सुक असलेली निखत ही सध्या सरावात गुंतली आहे. स्पर्धेसाठीचा सराव ती बेल्लारी येथे किंवा राष्ट्रीय शिबिराच्या ठिकाणी करते. माझ्यासाठी प्रत्येक स्पर्धा महत्वाची आहे. मात्र, जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धावर तुमची जागतिक क्रमवारी ठरत असते. त्यामुळे अशा स्पर्धांपूर्वी विशेष मेहनत घ्यावी लागते. जागतिक तसेच ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक मिळवण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. तसे स्वप्न मी सुद्धा पाहिले. मार्च महिन्यात भारतात होणार्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत स्वप्न सत्यात उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन.
वेलस्पून्स सुपर स्पोर्ट्स वुमन्स प्रोग्रामची निखत भाग आहे. भारताच्या या प्रतिभावंत महिला बॉक्सरने गेल्यावर्षी इस्तंबूल येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत फ्लायवेट तसेच बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत लाईट फ्लायवेट प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.