मुंबई : पनवेलच्या निमिशा थवई हिने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय तलवारबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना आगामी राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. लातूर येथे झालेल्या या स्पर्धेत निमिशाला १४ वर्षांखालील गटात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी तिचा समावेश असलेल्या मुंबई विभागाने सांघिक गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले.
लातूर जिल्हा क्रीडा संचालनालयच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत पनवेलच्या इंदुबाई वाजेकर शाळेच्या निमिशाने मुंबई विभागाच्या सुवर्ण पदकात मोलाचे योगदान दिले. सांघिक गटाच्या अंतिम फेरीत मुंबई विभागाने नाशिक विभागाचा १५-१२ असा पराभव केला. मुंबई संघात निमिशासह श्रावणी डुंबरे, क्षमिका मोदी (दोघी मुंबई शहर) व गुनगुन जैन (पनवेल महानगरपालिका) यांचाही समावेश होता.
वैयक्तिक गटात औरंगाबाद, कोल्हापूर व अमरावती या विभागाच्या खेळाडूंचा पराभव करत निमिशाने उपांत्य फेरी गाठली. नाशिक विभागाच्या खेळाडूविरुद्ध २-८ असा पराभव पत्करावा लागल्याने निमिशाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत छाप पाडलेल्या खेळाडूंची आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.