Nisha Dahiya Wrestling, India in Paris Olympics 2024: भारतीयकुस्तीपटू निशा दहिया महिलांच्या ६८ किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. तिला उत्तर कोरियाच्या सोल गुमने १०-८ अशा फरकाने पराभूत केले. निशाने उत्तर कोरियाच्या कुस्तीपटू विरुद्ध दमदार सुरुवात केली होती. ती सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत होती. पण उत्तारार्धात तिला दुखापत झाली. दुखावलेल्या हाताने आणि खांद्याने निशा वेदना होत असतानाही कुस्ती लढली. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाची कुस्तीपटू सोल गुम हिच्यासाठी विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आणि निशाचा २०२४च्या ऑलिम्पिकमधील प्रवास संपला.
निशाने सामन्यात दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्या हाफची सुरुवात होण्यापूर्वी निशा ४-० अशी आघाडीवर होती, पण दुसऱ्या हाफमध्ये तिच्या कोपराला दुखापत झाली आणि खांद्याचा सांधा निखळला. सामन्यात एक वेळ अशी होती की, निशा ८-१ ने आघाडीवर होती, पण त्यानंतर तिला वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांना तपासणीसाठी सामन्यात तब्बल तीन वेळा मॅटवर यावे लागले. या साऱ्या गोंधळात प्रतिस्पर्धी खेळाडूने सामन्याचा ताबा घेतला आणि निशाला पराभूत केले.
पराभवानंतर निशा दहियाच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. तिची प्रतिस्पर्धी पैलवान सोल गुमही सामना संपल्यावर तिच्याजवळ आली आणि तिला उठण्यासाठी मदत केली. निशाने याआधी पहिल्या फेरीत युक्रेनच्या टेटियाना सोव्हाचा ६-४ अशा फरकाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.