वेल्गिंटन : फॉर्मात नसलेला सलामीवीर मार्टिन गुप्तिलचा अनुभव बघता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याला आगामी भारत दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या १५ खेळाडूंच्या संघात स्थान दिले आहे; तर प्रदीर्घ कालावधीनंतर जिम्मी निशामचे पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड निवड समितीने मंगळवारी भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. त्यात मार्टिन गुप्तिलचा समावेश करण्यात आला. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात गुप्तिलला दोन कसोटी सामन्यांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताविरुद्ध त्याला आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गुप्तिलला संघात कायम राखण्यात आल्यामुळे जीत रावलला संघात स्थान मिळणार नसल्याचे निश्चित झाले. याव्यतिरिक्त न्यूझीलंड कसोटी संघात अष्टपैलू जिम्मी निशामचे पुनरागमन झाले आहे. प्रदीर्घ कालावधीपासून तो दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. निवड समितीचे गाविन लार्सेन म्हणाले, ‘‘जिम्मी दुखापतीतून सावरला असून, स्थानिक क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. तो कसोटी संघात पुनरागमनासाठी सज्ज आहे. वेगवान गोलंदाजी करणाऱ्या दोन अष्टपैलू खेळाडूंच्या समावेशामुळे संघाचा समतोल साधला गेला आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर फलंदाजी मजबूत असणे आवश्यक आहे.’’लार्सेन पुढे म्हणाले, ‘‘भारतीय संघ मजबूत असून, मायदेशात त्यांची कामगिरी शानदार आहे, पण न्यूझीलंड संघ मालिका जिंकून इतिहास घडवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. भारतात आम्हाला अद्याप मालिका जिंकता आलेली नाही. ही बाब आमच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करणारी आहे. भारतात आम्हाला तीन कसोटी सामने खेळायचे असून, आम्ही इतिहास घडविण्याच्या निर्धाराने उतरणार आहोत.’’ न्यूझीलंड व भारत संघांदरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील लढती कानपूर, कोलकाता आणि इंदूरमध्ये खेळल्या जाणार आहेत. त्यानंतर पाच वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. (वृत्तसंस्था)
निशामचे पुनरागमन, गुप्तिल संघात
By admin | Published: September 07, 2016 3:50 AM