नवी दिल्ली : भारताचा स्टार बॉक्सर निशांत देव पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणारा पहिला पुरूष बॉक्सर ठरला आहे. शुक्रवारी बँकॉक येथे बॉक्सिंग ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचून निशांतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले. या आधी निशांत देवने ७१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मोल्दोव्हाच्या व्हॅसिल सेबोटारीचा ५-० असा दारूण पराभव केला.
पॅरिसमध्ये २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता फेरी सुरू आहे. पात्रता फेरीत भारताचाबॉक्सिंगपटू निशांत देवने ७१ किलो वजनी गटात आपले स्थान निश्चित केले. बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या जागतिक ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचून निशांतने पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या बाजूने कोटा मिळवला.
ऑलिम्पिकसाठी निशांत सज्जदरम्यान, याआधीच्या पात्रता फेरीत पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्यात अपयशी झालेल्या निशांतने पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मोल्दोव्हाच्या वासिल सेबोटारीचा पराभव करून यावेळी आपला कोटा निश्चित केला. यासह तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, लोव्हलिना बोरगोहेन (महिला ७५ किलो), निखत झरीन (महिला ५० किलो) आणि प्रीती पवार (महिला ५४ किलो) यांनी गतवर्षीच आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करून ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. त्यामुळे आतापर्यंत भारताच्या तीन महिला आणि एक पुरूष असे चार बॉक्सर पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज झाले आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे आणखी २ बॉक्सर सहभागी होऊ शकतात. यामध्ये महिलांच्या ६६ किलो वजनी गटात अरुंधती चौधरी आणि पुरुषांच्या ५१ किलो गटात अमित पंघाल यांचा समावेश आहे. हे पात्रता फेरीत खेळणार आहेत, ज्यावर सर्वांच्या नजरा असतील यात शंका नाही. ६० किलो वजनी गटात अंकुशिता बोरोलाला स्वीडनच्या खेळाडूविरुद्ध २-३ असा पराभव पत्करावा लागला अन् ऑलिम्पिकचे तिकीट हुकले.