Nita Ambani IOC Member: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे २६ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारताकडून अनेक खेळाडू पाठवण्यात आले आहेत. या खेळाडूंनी भारतासाठी जास्तीत जास्त पदके जिंकावीत, अशी सर्व भारतीयांची अपेक्षा आहे. मात्र ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होण्याआधीच भारतीयांना खुशखबर मिळाली आहे. Mumbai Indians च्या मालकीण आणि रिलायन्स फाऊंडेशच्या संस्थापिका नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) सदस्यपद मिळाले आहे. पॅरिसमधील १४२ व्या IOC अधिवेशनात नीता अंबानी यांची भारतातून IOC सदस्य म्हणून एकमताने पुन्हा निवड करण्यात आली. हे IOC अधिवेशन सध्या सुरु असून नीता अंबानी या सदस्य म्हणून १००% मतांनी एकमताने विजयी झाल्या. यापूर्वी २०१६ मध्ये त्यांना हा बहुमान मिळाला होता.
पुन्हा निवडून आल्यावर बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, "आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा सदस्य म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. माझ्यावर विश्वास दाखवल्याबाबत मी समितीचे अध्यक्ष आणि IOC मधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छिते. ही फेरनिवडणूक हा केवळ वैयक्तिक मैलाचा दगड नसून जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या वाढत्या प्रभावाची ओळख आहे. मी हा आनंद आणि अभिमानाचा क्षण प्रत्येक भारतीयासोबत शेअर करते. भारत आणि जगभरातील ऑलिम्पिक चळवळीला बळकटी देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवण्यास मी उत्सुक आहे."
नीता अंबानी यांची २०१६ मध्ये रिओ दि जानेरो ऑलिम्पिक गेम्समध्ये प्रतिष्ठित संस्थेत सामील होण्यासाठी पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा IOC मध्ये सामील होणाऱ्या त्या भारताची पहिली महिला होत्या. नीता अंबानी यांनी संघटनेच्या उन्नतीसाठी खूप प्रयत्न केले. तसेच भारतातील क्रीडापटूंना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीनेही चांगले कार्य केले.