बुलडाणा: तब्बल ८७ किमीचे अंतर ११ तास ५८ मिनीटात पूर्ण करत बुलडाण्याचा नितीन चौधरी यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला आहे. विशेष म्हणजे जगातील काही मोजक्या मॅरेथॉन स्पर्धेमधील ही अत्यंत कठीण अशी मॅरेथॉन स्पर्धा आहे.विदर्भातून एकमेव नितीन चौधरी यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धा ही १२ तासांच्या आत पूर्ण करावी लागत असते. त्यात कठीण अशा या स्पर्धेत निर्धारित वेळेच्या आत त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केल्याने बुलडाण्याचे नाव या स्पर्धेमध्ये कोरल्या गेल आहे. त्यांच्या समवेत मराठवाड्यातील डॉ. घुले यांनी ११ तास ५१ मिनीटात ही स्पर्धा पूर्ण केले. पुणे येथील अतुल गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन चौधरी यांनी या स्पर्धेची तयारी केली होती. विशेष म्हणजे जगभरातून या स्पर्धेमध्ये २१ हजार स्पर्धेक सहभागी झाले होते.दक्षीण आफ्रिकेतील दरबन ते पीटरमिरसबर्ग या दरम्यान ही मॅरेथॉन घेण्यात येते. जागतिकस्तरावर मानाची आणि अत्यंत कठीण अशा स्वरुपाची ही स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये ५० छोट्या, मोठ्या टेकड्या पार कराव्या लागतात. स्पर्धेचे नियम ही कडक असून स्पर्धेत पाच कट आॅफ येतात. यामध्ये दिलेल्या निर्धारित वेळेत ठरावीक अंतर पार करावे लागते. त्यामुळे अनेक स्पर्धक या स्पर्धेदरम्यान मधातच बाद होतात. परंतू व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या नितीन चौधरी यांनी स्पर्धेतील सर्व अडथळे पारकरत ही एक अत्यंत कठीण अशी स्पर्धा पारकेली आहे.जगभरातून २१ हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात भारतातून १८६ स्पर्धकांचा सहभाग होता. त्यातल्या त्यात विदर्भातून या स्पर्धेत सहभाग घेणारे नितीन चौधरी हे एकमेव स्पर्धक होते. नऊ जून रोही ही स्पर्धा झाली असून सध्या नितीन चौधरी हे दक्षीण आफ्रिकेतून परतीच्या वाटेवर आहेत.
बुलडाण्याच्या उंचीचाही फायदासमुद्र सपाटीपासून दोन हजार १९० फूट उंचीवर बुलडाणा आहे. त्यामुळे येथे तुलनेने आॅक्सीजनचे प्रमाण कमी असते. परिणामी कमी आॅक्सीनमध्ये अधीक कार्यक्षम राहण्याची येथे जन्मलेल्या मुलांच्या ह्रदयाला सवय झालेली असते. उंचावरील बुलडाणा शहरात राहण्याचा फायदाहीही नितीन चौधरींना यात मिळाला असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. नाही म्हणायला बुलडाणा शहरातील मुले शालेय स्तरावर सातत्याने अॅथलेटीक्स स्पर्धेत विभाग तथा राज्यस्तरापर्यंत पोहोचत असल्याचा जुना इतिहास आहे.