पणजी : फिडे मास्टर नीतीश बेलूरकर याने मनोहर पर्रीकर ओपन ग्रॅण्डमास्टर ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत ‘ई’ गटातील विजेतेपद पटकाविले. या गटात एकूण ३०७ खेळाडूंनी भाग घेतला होता. पश्चिम बंगालचा ग्रॅण्डमास्टर दिप्तीयन घोषने रौप्य तर दिल्लीच्या आयर्न वर्षिनीने कांस्यपदक पटकाविले. यामध्ये रशिया, इस्त्राईल, उक्रेन, इरान, उज्बेगिस्तान, इंडोनेशिया, अमेरिका, कॅनडा आणि यजमान भारतातील खेळाडूंचा समावेश होता. नीतीशचा हा विजय ऐतिहासिक ठरला.
९६० या फॉर्मेटमध्ये प्रत्येक सामन्यासाठी तीन मिनिटे आणि २ सेकंदांचा वेळ होता. १३ सामन्यांतून नीतीशने १०.५ गुण मिळवत सुवर्णपदक पटकाविले.इंडोनेशियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर ताहेर थिलोफस हा ‘ड’ गटातील सुवर्णपदक विजेता ठरला. या गटात बुलेट फॉर्मेटमध्ये सामने झाले. या गटात ३७३ खेळाडूंचा विक्रमी सहभाग लाभला.उज्बेगिस्तानचा ग्रॅण्डमास्टर सिन्डारोव्ह झोवोखिर याने रौप्यपदक तर इस्त्राईलचा आंतरराष्टीय मास्टर डेविड ग्रोटेत्की याने कांस्यपदक पटकाविले.
दरम्यान, ही स्पर्धा गोवा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केली होती. स्पर्धेत एकूण पाच गट आहेत. त्यातील बी, सी, डी, ई या गटातील सामने आटोपले आहे. ए गटातील सामने २ आॅक्टोबर रोजी होतील. यामध्ये इलो २००० गुणांवरील खेळाडूंचा समावेश असेल.