नवी दिल्ली : सीओएच्या मंजुरीशिवाय बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागाबाबत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकांच्या समितीने (सीओए) मंगळवारी स्पष्ट केले. आयसीसीच्या महसूल व संचालन मॉडेलमध्ये बदल करण्याच्या विरोधातील मतदानामध्ये बीसीसीआयला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर, भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सहभागाबाबत चर्वितचर्वण सुरू झाले आहे. त्यानंतर राय यांनी हे वक्तव्य केले आहे. राय यांनी सांगितले की, ‘आयसीसी महसूल वाटपाच्या मॉडेलबाबत कुठलाही निर्णय आमसभेच्या विशेष बैठकीमध्ये (एजीएम) घेण्यात यावा, असे आम्ही निर्देश दिले आहेत, पण आमच्या मंजुरीशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून हटण्याबाबत कायदेशीर नोटीस बजावता येणार नाही, असे आम्ही बीसीसीआयला कळवले आहे.’ सीओएला असे निर्देश देण्यास बाध्य करण्यात आले. कारण, मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या विश्वासातील १० प्रतिनिधींनी टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून स्पर्धेतून माघार घेण्याच्या आणि आयसीसीवर कारवाई करण्याच्या पर्यायावर चर्चा केली. बीसीसीआयची एजीएम ७ मे रोजी होणार आहे. राय म्हणाले, ‘काही अधिकाऱ्यांनी टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून या विषयावर चर्चा केली असल्याचे वृत्त आम्हाला कळले आहे. असे निर्णय घाईत घेणे योग्य नाही, हे समजण्याची गरज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली तर भारताला आठ वर्षे आयसीसी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे मोजकेच सदस्य यावर निर्णय घेऊ शकत नाही.’ बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा एक गट बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर याच्या नेतृत्वाखालील विश्व संस्थेविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव पारित करण्यास उत्सुक आहे. जर बीसीसीआयने एजीएममध्ये स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर सीओए सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश घेण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात आयसीसी बोर्डाच्या बैठकीमध्ये प्रस्तावित महसूल वाटपाच्या मॉडेलसाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये बीसीसीआयला १-१३ ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्याची परिस्थिती उद््भवली तर बीसीसीआयने एजीएममध्ये मतदानासाठी पात्र सर्व ३० सदस्यांच्या सर्वसंमतीने निर्णय घ्यायला हवा. सर्वसंमतीने निर्णय झाला तर हा स्पर्धेतून माघार घ्यायला हवी.- विनोद राय
सीओएच्या मंजुरीशिवाय निर्णय नाही
By admin | Published: May 03, 2017 12:46 AM