केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठं बळ पंजाब-हरियाणातून मिळालं होतं. अखेर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर होते. पण, फिरोजपूर येथील रॅलीसाठी निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडवण्यात आला. यावरून भाजपाचे सर्व नेते आक्रमक झाले आहेत. त्यात भारताची फुलराणी सायना नेहवाल हीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
मागण्या मान्य होत नाही तोवर भाजपाच्या प्रत्येक रॅलीला विरोध करणार असल्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांमधील संताप कमी होईल असं वाटत होतं परंतु पंजाबमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पंतप्रधान मोदींची रॅली असल्यानं शेतकरी विरोध करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. तरीही पंजाब सरकारकडून सुरक्षा व्यवस्थेत गलथानपणा दाखवण्यात आला. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सायना नेहवाल म्हणाली, 'पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड झाल्यास कोणतेही राष्ट्र स्वत:ला सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते.''
सायना नेहवालची कारकीर्द
- सायनानं आतापर्यंत 24 आंतरराष्ट्रीय जेतेपदं पटकावली आहेत. तिनं तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. BWFच्या बहुतांश स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. तिनं BWF वर्ल्ड चॅम्पियनशीप, BWF वर्ल्ड ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर पदकं आहेत.
- ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. शिवाय वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय बॅडमिंटनपटूचा मानही सायनाच्या नावावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ( 2010 आणि 2018) दोन सुवर्णपदक नावावर असणारी ती पहिलीच भारतीय आहे. 2016मध्ये तिला पद्म भुषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्यानंतर तिला राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारही देण्यात आला.