मीरपूर : टीम इंडियाचा महत्त्वपूर्ण क्रिकेटपटू सुरेश रैनाने महेंद्रसिंह धोनीची पाठराखण करण्यासाठी उडी घेतली असून, कर्णधार आणि त्याच्या कामगिरीविषयी अनादर दाखवला जाऊ शकत नाही आणि त्याच्यात अजून खूप क्रिकेट बाकी असल्याचे म्हटले आहे.बांगलादेशाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावल्यानंतर सामनावीर ठरलेल्या रैनाने आपला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीचा उघडपणे बचाव केला. बांगलादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमावल्यानंतर धोनीवर चोहोबाजूने टीका होत आहे.रैना म्हणाला, ‘‘त्याने जी उपलब्धी मिळवली आहे त्याचा तुम्ही अनादर करू शकत नाही. धोनीने बीसीसीआयसाठी बऱ्याचशा ट्रॉफी जिंकल्या आहेत. याशिवाय तो एक चांगला व्यक्ती असून, प्रामाणिकही आहे. फक्त एका मालिकेमुळे तो खराब ठरू शकत नाही. तो एक चांगला नेता आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्याच्यावर सगळ्यांचा लोभ आहे. त्याच्यात अजून खूप क्रिकेट बाकी आहे. त्यामुळे काही वेळ प्रतीक्षा करायला हवी.’’तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात २१ चेंडूंत ३८ धावा फटकावताना गोलंदाजीत ३ गडी बाद करणारा रैना म्हणाला, ‘‘एक मालिका गमावल्याने कोणता संघ खराब होत नसतो. ज्याप्रमाणे धोनीने फलंदाजी केली आणि संघाचे नेतृत्व करीत विजय मिळवून दिला त्याचे श्रेय त्याला द्यायला हवे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाचा ग्राफ नेहमीच उंचावला जात आहे. हा या हंगामातील अखेरचा सामना होता. आता पुढे केव्हा एकदिवसीय सामना खेळायचा आहे हे आम्हाला माहीत नाही. या स्वरूपात भारताची कामगिरी चांगली असून, आम्ही जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहोत.’’रैनाने धोनीच्या फलंदाजीच्या फळीत वरच्या क्रमांकावर येण्याविषयीही मत व्यक्त केले. तो म्हणाला, ज्याप्रमाणे त्याने गेल्या दोन सामन्यांत फलंदाजी केली, त्यावरून त्याच्यासाठी नंबर चार हा किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. त्याने गेल्या काही वर्षात खूप जबाबदारी घेतली आहे. त्याने ते तिसऱ्या वनडेत करूनही दाखवले. त्याने शिखरसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
धोनीविषयी कोणी अनादर दाखवू शकत नाही
By admin | Published: June 26, 2015 1:19 AM