ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ : मी प्राणाला मुकले असते, अशी प्रतिक्रिया रिओ आॅलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओ.पी. जैशाने व्यक्त केली. भारताला निर्धारित पॉर्इंट मिळाले असताना मला पाणी आणि एनर्जी ड्रिंक उपलब्ध झाले नाही, असेही जैशाने सांगितले.
रिओ आॅलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणारी जैशा २ तास ४७ मिनिट १९ सेकंद वेळेसह ८९ स्थानावर राहिली. जैशा म्हणाली, ‘तेथे उष्ण वातावरण होते. स्पर्धेला सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला. आमच्यासाठी ना पाणी होते ना एनर्जी ड्रिंक होते. केवळ एकदा ८ किलोमीटर अंतरावर रिओ आयोजकांतर्फे मला पाणी मिळाले. त्याची काही मदत झाली नाही. सर्व देशांचे दोन किलोमीटर अंतरावर स्टॉल होते, पण आपल्या देशाचा स्टॉल रिकामा होता.’
जैशा मॅराथॉन पूर्ण केल्यानंतर फिनिश लाईनवर कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशिक्षक निकोलई स्नेसारेव्ह यांचा एका डॉक्टरसोबत वाद झाला. त्यानंतर त्यांना १२ तासांसाठी पोलीस ठाण्यात राहावे लागले.
जैशा पुढे म्हणाली, ‘आम्हाला आमच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडून एनर्जी ड्रिंक मिळणे अपेक्षित होते. हा नियम आहे. आम्ही दुसऱ्या कुठल्या संघाकडून पाणी घेऊ शकत नाही. मी तेथे भारतीय फलक बघितला, पण तेथे काहीच नव्हते. मला खूप अडचणीला सामोरे जावे लागले. मी शर्यतीनंतर बेशुद्ध झाली होती. मला ग्लुकोज देण्यात आले. माझा जीव जातो की काय, असे वाटत होते.’
जैशाने स्नेसारेव्ह यांच्या वादाचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, ‘माझे प्रशिक्षक रागात होते. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी डॉक्टरांसोबत वाद घातला. मी गतप्राण झाले, असे प्रशिक्षकांना वाटले. त्यांनी डॉक्टरांना धक्का दिला आणि माझ्या रुममध्ये शिरले. कारण मला काही झाले तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल, याची त्यांना कल्पना होती. ’