मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘विश्वचषक बचाओ अभियान’ राबविले आहे. या अभियानांतर्गत विश्वचषकादरम्यान भारतीय संघातील खेळाडूंसोबत त्यांच्या प्रेमिका, पत्नी यांना ‘एण्ट्री’ देण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंचे संपूर्ण लक्ष केवळ क्रिकेटवर केंद्रित असावे, यासाठी ‘नो रोमान्स, ओन्ली क्रिकेट’ अशी भूमिका बीसीसीआयने घेतली असून, ते लवकरच या संदर्भात औपचारिक घोषणा करतील, असे सूत्रांनी सांगितले आहे. विश्वचषकादरम्यान आता खेळाडूंना त्यांच्या पत्नी वा प्रेमिकेला सोबत नेण्यास परवानगी देण्यात येणार नाही. आगामी विश्वचषक स्पर्धा ही व्हॅलेंटाईन डे म्हणजे १४ फेब्रुवारीलाच सुरू होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना हा दिवस आपल्या प्रेमिकेपासून दूर राहूनच साजरा करावा लागेल. मात्र, बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. जर ही घोषणा झाली, तर भारतीय उपकर्णधार विराट कोहली आणि त्याची मैत्रीण अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना एकाच हॉटेलमध्ये राहण्यास परवानगी दिली जाणार नाही. सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया, तसेच न्यूझीलंडच्यामैदानावर उपस्थित राहण्यास हरकत नाही. मात्र, खेळाडूंसोबत वेळ घालवण्यास बीसीसीआय परवानगी देणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.(वृत्तसंस्था)
नो रोमान्स, ओन्ली क्रिकेट!
By admin | Published: January 19, 2015 3:10 AM