नवी दिल्ली : चीनचा बॉक्सर जुल्फिकार मेमतअलीविरुद्ध लढतीसाठी विशेष सरावावर भर न देता काही तांत्रिक सुधारणा केल्याचे भारताचा स्टार व्यावसायिक बॉक्सर विजेंदरचे मत आहे. विजेंदर डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन, तर मेमतअली डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन आहे. ५ आॅगस्ट रोजी ही लढत होईल. विजेंदरने मागच्या वर्षी फ्रान्सिस चेकाविरुद्ध जेतेपद कायम राखण्यात यशस्वी ठरला होता. त्यानंतर सात महिन्यांत तो एकही लढत खेळला नाही. मेमतविरुद्ध मोसमातील पहिलीच लढत असेल, तरीही ३१ वर्षांचा विजेंदर मुळीच चिंतेत नाही.प्रतिस्पर्धी मेमतअलीविरुद्ध विचारताच विजेंदरने बचावात्मक पवित्रा घेतला. तो म्हणाला, ‘मेमतअली डावखुरा बॉक्सर असल्याने मी स्वत:च्या तंत्रात किरकोळ बदल केले. पण सरावात आणि डावपेचात काहीही बदल झालेले नाहीत.’ विजेंदरने रिंकबाहेरील व्यस्ततेवरदेखील भाष्य केले. मुलगा अबीर आता शाळेत जायला लागला असल्याची माहिती दिली. मला प्रत्येक दिवशी प्रश्न विचारत असल्याने जोरदार तयारी करावी लागते. मी अनेकदा त्याला घेऊन बाहेर पडतो तेव्हा चाहते माझ्यासोबत सेल्फी काढतात. त्यावर अबीरचा सवाल असतो, ‘तुम्ही असे काय केले की ज्यासाठी लोक तुमच्यासोबत फोटो घेऊ इच्छितात.’ यावर माझे उत्तर असते, मला माहीत नाही, कदाचित मी बॉक्सर असल्याने मला ओळखत असावेत.’ (वृत्तसंस्था)मँचेस्टर येथे ट्रेनर ली बीयर्ड यांच्यासोबत सरावात व्यस्त असलेला विजेंदर म्हणाला, ‘एप्रिल महिन्यात ही लढत होणार होती; पण तो जखमी झाल्याने तारीख लांबली. आता ५ आॅगस्ट रोजी ही लढत होणार आहे.’ बीजिंग आॅलिम्पिकचा कांस्यविजेता विजेंदरच्या मते, लढती पाठोपाठ होत नसल्या तरी सरावात सातत्याच्या बळावर मुंबईत विजय मिळविण्यात अडसर जाणवणार नाही. वर्षभरात दोन किंवा तीन लढती पुरेशा आहेत. मला कुणापुढे काही सिद्ध करायचे नसल्याने चिंतेचे कारण नाही.’
मेमतअलीविरुद्ध विशेष तयारी नाही : विजेंदर
By admin | Published: July 14, 2017 1:02 AM