Novak Djokovic, French Open: नवीन वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनला सोमवारी सुरूवात झाली. पण या स्पर्धेचा गतविजेता नोवाक जोकोविचला मात्र या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. लसीकरण न झाल्याने त्याचा व्हिसा रद्द करून त्याला देशाबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले. जोकोविचच्या अडचणी काही केल्या संपत नाहीयेत. ऑस्ट्रेलियन ओपनला मुकावे लागलेल्या जोकोविचला आता फ्रेंच ओपनकडूनही इशारा देण्यात आला आहे. लसीकरण झालं नसेल तर फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळता येणार नाही. त्यामुळे लसीकरण करूनच आमच्या देशात खेळायला ये असा थेट इशारा फ्रान्सच्या क्रीडा मंत्रालयाने जोकोविचला दिला आहे.
जोकोविचला काही महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता, त्यामुळे त्याचे संपूर्ण लसीकरण झाले नव्हते. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर त्याचे लसीकरण न झाल्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. त्याने कोर्टात धाव घेतल्यावर त्याच्या व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. पण त्यानंतर पुन्हा एकदा त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियन जनतेच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलं सरकारकडून सांगण्यात आले. त्यानंतर फेडरल कोर्टानेही हा निर्णय कायम ठेवल्याने अखेर जोकोविचला ऑस्ट्रेलिया देश सोडून जावे लागले. तशातच आता फ्रेंच ओपनबद्दलही त्याला इशारा देण्यात आला आहे.
जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित असूनही नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये समाविष्ट होता आले नाही. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचचा सामना त्याचाच सहकारी मिओमीर केक्मानोविक याच्याशी होणार होता. सोमवारी संध्याकाळी हा सामना नियोजित होता. पण जोकोविचच्या विरोधात कोर्टाने निकाल दिल्यामुळे त्याला देश सोडावा लागला. ऑस्ट्रेलियाने जोकोविचला धक्का दिल्यानंतर आता फ्रेंच ओपन संदर्भात फ्रान्सच्या क्रीडा मंत्रालयानेही जोकोविचला इशारा दिला आहे. यावर जोकोविच काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.