नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले. देशवासीयांप्रमाणे सेलेब्रिटीनींही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. पण, पुढील महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना विसा देण्यास केंद्रीय गृह खात्यानं मंजूरी परवानगी दिली आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे सचिव राजीव भाटिया यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय गृह खात्यानं पाकिस्तानी खेळाडूंचा विसा मंजूर केला आहे आणि तो उच्चायुक्तांकडे व इस्लामाबाद येथे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती भाटिया यांनी दिली. ते म्हणाले,'' केंद्रीय गृह खात्यानं त्यांचा विसा मंजूर केला असून तो उच्चायुक्तांकडे व इस्लामाबाद येथे पाठवण्यात आला आहे. भारतीय उच्चायुक्तांकडून मला कॉल आला होता आणि त्यांनी खेळाडूंच्या नावांची शहानिशा करून घेतली. आशा करतो की त्यांचा विसा मंजूर करण्यात येईल.''
भाटिया यांनी पुढे सांगितले की,'' पाकिस्तानचे एक प्रशिक्षक व दोन खेळाडू येत्या शुक्रवारी भारतात येण्याची अपेक्षा आहे. विसा नाकारण्यात येणार नाही, असा विश्वास गृह मंत्रालयाने दिला आहे.'' 20 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्ली येथे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 16 खेळाडू पात्र ठरणार आहेत.