1960 पासून युरोपियन नेशन्स कप या नावाने सुरु झालेल्या स्पर्धेचे युरोपियन चॅम्पियनशीप असे नामकरण करण्यात आले. 1996च्या स्पर्धेवेळी या स्पर्धेचे पुन्हा बारसे घालण्यात येवून ‘‘युरो कप’’ असे नामकरण करण्यात आले, जे आजतागायत कायम आहे. या वेळी स्पर्धेचा लोगोही बदलण्यात आला. शिवाय स्पर्धेचे स्वरुपही बदलण्यात आले. ते गेल्या स्पर्धेपर्यंत कायम होते. यंदा म्हणजे २0१६ च्या स्पर्धेचे स्वरुप आमुलाग्र बदलले आहे. (त्याचा आढावा आपण शेवटच्या भागा घेणार आहोतच) १९९६ लाआठ ऐवजी सोळा संघांची मुख्य स्पर्धा खेळवण्यात आली. सहा संघांचा एक असे आठ गट तयार करुन त्यांच्यात पात्रता फेरी झाली. याचे विजेते अन् उपविजेते स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात आले. स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे असल्यामुळे त्या गटातून तो आपसूकच पात्र ठरला. स्पर्धेची नॉकआउट फेरी अत्यंत रटाळ आणि संथ झाली. सात सामन्यात केवळ ९ गोल (पेनाल्टी शूटआउट वगळता) नोंदवण्यात आले. उपांत्यपूर्व फेरीत जर्मनी-क्रोएशिया, स्पेन-इंग्लंड, झेक प्रजासत्ताक-पोर्तुगाल आणि फ्रान्स -नेदरलँड अशा लढती झाल्या. उपांत्य फेरीत जर्मनी इंग्लंडशी तर झेक प्रजासत्ताक फ्रान्सशी भिडले. हे दोन्ही सामने पेनाल्टी शूटआउटवर निकाली झाले. जर्मनी आणि झेक प्रजासत्ताक यांच्यातील अंतिम सामनाही १-१ असा बरोबरीत होता. जर्मनीच्या आॅलिव्हर बेअरहोफ्फने जादा वेळेत (९५मिनिटाला) गोल्डन गोल नोंदवून जर्मनीला स्पर्धेचे तिसरे विजेतेपद आणि ‘‘पहिला युरो कप’’ मिळवून दिला. या स्पर्धेला बदनामीचा एक डागही लागला. १५ जून १९९६ रोजी म्हणजे जर्मनी आणि रशिया यांच्या सामन्याच्या आदल्यादिवशी मँचेस्टर शहरात बॉम्बहल्ला झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या कार्पोरेशन रोडवर एका व्हॅनमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला. या हल्ल्यात २१२ लोक जखमी झाले. प्राणहानी मात्र झाली नसली तरी ७00 मिलियन पौंड इतके प्रचंड नुकसान या स्फोटात झाले. प्रोव्हीजनल आयरिश रिपब्लिक आर्मी (आयआरए) या अतिरेकी संघटनेने पाच दिवसानंतर या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. जर्मनी-रशिया यांच्यातील सामना कडेकोट बंदोबस्तात पार पडला. तो जर्मनीने ३-0 असा जिंकला. युरो स्पर्धेवर झालेला आतापर्यंतचा एकमेव अतिरेकी हल्ला आहे.
स्पर्धेचे युरो कप असे नामकरण
By admin | Published: June 06, 2016 2:28 AM